इस्लामपूर : माजी मंत्री, राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी हल्लाबोल यात्रेचे नेतृत्व करून भाजपला टार्गेट केले आहे. राज्य पातळीवर विरोधी पक्षाचे गटनेते म्हणून त्यांची छाप पडली आहे. परंतु त्यांच्या नेतृत्वाखाली इस्लामपूर नगरपालिकेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक मात्र कोमात आहेत. पालिका सभागृहात संख्याबळ जास्त असूनही विकास आघाडीपुढे त्यांची डाळ शिजत नाही. वेळोवेळी या नगरसेवकांची हतबलता समोर येऊ लागली आहे.कृषी महोत्सवाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इस्लामपूर नगरपालिकेला जादा निधी दिल्याचे सांगून जयंत पाटील यांच्या आरोपांना उत्तर दिले. यावर प्रतिक्रिया विचारण्यासाठी पालिकेतील विरोधी गटनेते संजय कोरे यांच्याशी मंगळवारी सकाळी संपर्क साधला. त्यांनी भ्रमणध्वनी न स्वीकारता नंतर संपर्क साधतो, असा संदेश पाठवला. त्यानंतर त्यांनी रात्री सात वाजता संपर्क साधला. यावरून सत्ताधाऱ्यांपुढे राष्ट्रवादीचे गटनेते किती हतबल आहेत, हे स्पष्ट होते.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नगरसेवक शहाजी पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, दुपारपर्यंत प्रतिक्रिया देऊ, असे स्पष्ट करुन त्यांनी दुपारी उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील यांच्यासमवेत उत्तराचे पत्रक प्रसिध्दीमाध्यमांना पुरविले. ज्या नगरसेवकांना त्या पत्रकाबद्दल माहिती नव्हती, त्यांचीही नावे टाकण्यात आली होती. त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली. यावरून त्यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले.वर्षभरात पालिकेतील सभागृहाचे कामकाज पाहता सभा दिवसभर चालते; मात्र एकमेकांवर शिंतोडे उडविण्यापलीकडे काहीच होत नाही. विकास आघाडीने नवीन प्रयोग म्हणून जनतेला मासिक सभेचे कामकाज पाहता यावे यासाठी नाट्यगृहात एलसीडी प्रोजेक्टरद्वारे पालिकेतील सभेचे थेट प्रक्षेपण दाखविण्यास सुरुवात केली आहे.
हा नावीन्यपूर्ण उपक्रम असल्याने पहिल्या २ ते ३ सभांना नागरिकांची गर्दी झाली. परंतु सभेतून काहीच निष्पन्न होत नाही, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी आता सभांकडे पाठ फिरवली आहे. नुकत्याच झालेल्या सभेचे प्रक्षेपण पाहण्यासाठी पालिकेतील कर्मचारी वगळता कोणीही नागरिक नव्हते.गेल्या ३१ वर्षातील राष्ट्रवादीच्या कारकीर्दीत विरोधकांची ताकद नगण्य होती. तत्कालीन विरोधी पक्षनेते बी. ए. पाटील आणि विजय कुंभार यांनी त्यावेळी सभागृहात वचक ठेवला होता. सध्या मात्र विरोधी राष्ट्रवादीकडे बहुमत असतानाही सभागृहात ते मूग गिळून गप्प असतात.