कुपवाड : कुपवाडचे सुपुत्र, विधानसभा व विधानपरिषदेचे माजी सदस्य, ज्येष्ठ समाजवादी नेते प्रा. शरद रामगोंडा पाटील (वय ८१, रा. राणाप्रताप चौक, कुपवाड) यांचे बुधवारी पहाटे साडेपाच वाजता दुःखद निधन झाले. ते गेल्या काही महिन्यापासून आजारी होते.
त्यांच्या निधनाने कुपवाड शहरावर दुःखाचा डोंगर कोसळला. निधनाची बातमी कळताच कुपवाड परिसरातील सर्व व्यापारी, दुकानदार, खोकेधारक तसेच सर्व शाळा व्यवस्थापनाने एक दिवसाची सुट्टी जाहीर करून दुखवटा व्यक्त केला आहे. बुधवारी दुपारी १२ वाजता कुपवाड शहरातील सर्व मुख्य मार्गावरून तसेच देशभक्त आर. पी. पाटील विद्यालय, कन्या शाळा, जैन बस्ती, लिंगायत गल्ली, सोसायटी चौक मार्गावरून अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. शहरातील बुधगाव रस्त्यावरील जैन समाज स्मशान भुमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
ते दोन वेळा विधानसभा आणि एक वेळा विधान परिषदेचे सदस्य होते. त्यांच्या पश्चात पाच मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण शहरावर शोककळा पसरली आहे.