शिरढोण (जि. सांगली) : कोंगनोळी (ता. कवठेमहांकाळ) येथील आटपाडकर वस्ती येथे पिसाळलेल्या कोल्ह्याच्या चाव्यात महिला गंभीर जखमी झाली. सुरेखा लिंगप्पा चौरे असे जखमी महिलेचे नाव आहे. यावेळी आपल्या आईला वाचविण्यासाठी सुरेखा यांची मुलगी कविता हिने धाडसाने दोन्ही हाताने कोल्ह्याचा गळाच आवळून धरला. त्यावेळी आईने कोल्ह्याच्या तोंडातील बोट काढून घेत बाजूला पडलेले दगड व काठी कोल्ह्यावर उगारल्याने पुढील अनर्थ टळला.
कोंगनोळी येथील आटपाडकर वस्ती येथे सुरेखा लिंगाप्पा चौरे या आपल्या मुलीसह रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास फिरण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. यावेळी अचानकपणे पिसाळलेल्या कोल्ह्याने चौरे यांच्यावर हल्ला केला व हाताचा चावा घेत बोट धरले. घाबरलेल्या चौरे यांनी कोल्ह्याच्या तोंडातील बोट काढून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी धाडसाने कविताने कोल्ह्याचा गळा आवळून धरत आईवरील हल्ला परतवून लावला. यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
भाजप प्रदेशाध्यक्षांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल, महिला नेत्याची पोलिसांत तक्रार
पिसाळलेल्या कोल्ह्याचा मानवी वस्तीत वावर आणि महिलेवरील हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, या भयानक हल्ल्यावेळी उपस्थित मुलीने थेट पिसाळलेल्या कोल्ह्याचा गळाच आवळून धरला. यामुळे त्या मुलीच्या धाडसाचे परिसरातून कौतुक होत आहे.
जेव्हा सुरेखाला पिसाळलेला कोल्हा चावा करत होता तेव्हा मुलगी कविता हिने धाडसाने जिवाची काळजी न करता झाशीच्या राणीसारखी धावत जाऊन त्या कोल्ह्याचा गळा आवळून धरला. तो एवढ्या जोरात आवळून धरला की, त्याने धरलेला हात सोडून तो पळून गेला.