सांगली लोकसभा जागेच्या षडयंत्रात फसलो; काँग्रेसचा महाविकास आघाडीसोबत राहण्याचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 08:45 AM2024-04-26T08:45:18+5:302024-04-26T08:46:03+5:30
महाविकास आघाडीविरोधात बंडखोरी करणारे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्यावरील कारवाईचा अहवाल कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आम्ही तयार केलेला आहे
सांगली : मागील लोकसभा निवडणुकीत सांगलीतूनकाँग्रेसचे चिन्ह गायब केले. यंदाच्या निवडणुकीतही असेच षडयंत्र रचण्यात आले. या षडयंत्रात मी फसलो, अशी स्पष्ट कबुली देत ज्या लोकांनी सांगलीच्या जागेला दृष्ट लावली. त्यांच्या राजकारणालाही लवकरच दृष्ट लावू, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी येथे दिला.
सांगलीत काँग्रेसचा मेळावा पार पडला. यावेळी ते म्हणाले, सांगलीच्या जागेसाठी ज्या लोकांनी राजकारण केले, त्यांचा हिशेब चुकता केल्याशिवाय राहणार नाही.
कारवाईचा अहवाल दिल्लीला पाठविणार
महाविकास आघाडीविरोधात बंडखोरी करणारे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्यावरील कारवाईचा अहवाल कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आम्ही तयार केलेला आहे. तो दिल्लीला पाठविण्यात येईल. दिल्लीतील निर्णयाप्रमाणे कारवाई होईल. कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही, अशी माहिती पटोले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कारस्थानाचा योग्य वेळी वचपा काढणारच : विश्वजीत कदम
लोकसभेसाठी सांगलीत वेगळे राजकारण शिजत असल्याची कल्पना आम्ही वरिष्ठ नेत्यांना दिली होती, तरीही येथील कटकारस्थान यशस्वी करण्यात काही लोक यशस्वी झाले. त्यांच्या या कटाचा वचपा योग्यवेळी काढणारच, असा इशारा काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी गुरुवारी काँग्रेस मेळाव्यात दिला. ते म्हणाले, सापशिडीसारख्या खेळाचा अनुभव लोकसभा निवडणुकीत आला. आम्ही योग्य मार्गाने जात होतो. अचानक एक साप चावला अन् आम्ही खाली घसरलो तरीही या खेळात शिडी चढणारच. ज्यांच्यासाठी आम्ही लढलो त्या मित्राला पक्षश्रेष्ठींकडून राज्यसभेचे वचन घेतले. अपक्ष लढणे सोपे नसल्याचे सांगून मन वळविण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी ऐकले नाही. दुसरीकडे जागेच्या तडजोडीत पैलवान उमेदवाराला विधानसभेची ऑफर देऊन निवडून आणण्याची ग्वाही दिली होती. त्यांनीही ऐकले नाही, असेही ते म्हणाले.