सांगली : रेल्वे प्रवासात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी रामदास अण्णाप्पा मांगले (वय ३५, रा. जख्खेवाडी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) यास दोषी धरुन तीन वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. दंडातील तीन हजार रुपये पीडित मुलीस नुकसानभरपाई म्हणून देण्याचा आदेश दिला आहे. जिल्हा व सत्रन्यायाधीश सौ. एस. एस. सापटणेकर यांनी सोमवारी हा निकाल दिला.पीडित मुलगी मामासोबत मुंबई ते कोल्हापूर सह्याद्री एक्स्प्रेसने प्रवास करीत होती. रात्रीच्यावेळी मुलगी झोपली होती. रेल्वेडब्यात गर्दी होती. त्यावेळी आरोपी रामदास मांगले याने या मुलीवर लैंगिक अत्याचार केले. मुलगी झोपेतून खडबडून जागी झाली. तसेच अन्य प्रवाशांनीही हा प्रकार पाहिला. रेल्वे थांबवून पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी मांगलेला ताब्यात घेतले. रेल्वे मिरजेत आल्यानंतर पीडित मुलीने लोहमार्ग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
मांगले याच्याविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या खटल्यात पाच साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पीडित मुलगी, फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व तपास अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. सरकारतर्फे सहाय्यक जिल्हा सरकारी वकील अनिल कुलकर्णी यांनी काम पाहिले.नुकसान भरपाईआरोपी रामदास मांगले याला दोषी ठरवून पाच हजार रूपयांचा दंड सुनावण्यात आला आहे. यातील तीन हजार रूपये पीडित अल्पवयीन मुलीस नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.