सांगली : राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांचा 26 जून हा जन्मदिवस महाराष्ट्र शासनाच्या वतीने सामाजिक न्याय दिन म्हणून संपूर्ण राज्यभर साजरा केला जातो. यानिमित्त समाजकल्याण विभागाच्या वतीने सामाजिक न्यायाच्या विविध योजनांवर आधारित चित्ररथ तसेच विद्यार्थ्यांच्या सामाजिक न्याय दिंडीला चांगला प्रतिसाद मिळाला.
यावेळी बग्गीतील राजर्षि शाहू महाराजांच्या वेशातील श्रीकांत पोळ यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. प्रारंभी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी एस. टी. स्टॅण्ड समोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पगुच्छ अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर संविधान वाचन करण्यात आले.
यावेळी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन कवले, जिल्हा परिषद जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) महेश चोथे, समाजकल्याण विभागाचे सचिन साळे, दलितमित्र अशोक पवार यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरू झालेल्या या रॅलीची सांगता स्टेशन चौकातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ येथे झाली. रॅलीच्या मार्गात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज, पंडित नेहरू, महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय कडणे यांनी केले.यावेळी रॅलीत सामाजिक समता रथाबरोबर हि. हा. रा. चिं. पटवर्धन हायस्कूल, सिटी हायस्कूल आदि शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांच्या हातात राजर्षि छत्रपती महाराजांबद्दल माहिती देणारे विविध फलक होते.
रॅलीत सहभागी विद्यार्थी-विद्यार्थिनींना खाऊचे वाटप करण्यात आले. सामाजिक न्याय दिनाच्या या कार्यक्रमास विविध अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, विविध शाळांचे विद्यार्थी, शिक्षक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.