सांगली : एकीकडे रुग्णाच्या प्रकृतीची धाकधूक आणि दुसरीकडे रात्र कोठे काढायची याची चिंता अशा दुहेरी कोंडीत रुग्णांचा नातेवाईकांना रहावे लागत आहे. कडाक्याच्या थंडीच जिन्याच्या पायऱ्यांवर किंवा ओपीडीच्या व्हरांड्यात रात्रीची पथारी पसरावी लागत आहे.दररोज हजारभर रुग्णांना उपचार देणाऱ्या सांगलीच्या शासकीय रुग्णालयात असे विदारक चित्र दररोजच पहायला मिळते. निवारागृहाचे काम सुरु होण्याची चिन्हे नसल्याने नातेवाईकांचे हाल तूर्त तरी संपण्याची शक्यता नाही. रुग्णालयाच्या आवारात निवारा शेडसाठी पैसेही मंजूर झालेत, पण सार्वजनिक बांधकामच्या कार्यालयात घोडे अडले आहे. रुग्णालयाच्या प्रशासनाने वारंवार पाठपुरावा करुनही कार्यवाही झालेली नाही. मिरजेतील शासकीय रुग्णालयात विश्रांतीसाठी हॉल, कपडे बदलण्यासाठी महिला-पुरुषांना स्वतंत्र कक्ष व स्वच्छतागृहे आहेत. सांगलीत मात्र सोय नाही. सांगली, कोल्हापूर बेळगावी अशा तीन जिल्ह्यांतून रुग्ण येतात. त्यांच्या नातेवाइकांची सोयी-सुविधांअभावी ससेहोलपट होते. रात्री झोपायचे कोठे? हा मोठा प्रश्न असतो. मिळेल त्या जागेत डासांचा व थंडीवाऱ्याचा सामना करत रात्री काढाव्या लागतात.त्यांच्यासाठी निवारा शेड मंजूर आहे. जिल्हा नियोजन समितीकडून ४६ लाख रुपये मिळाले आहेत. सार्वजनिक बांधकामकडे सात-आठ महिन्यांपू्र्वीच निधी जमा झाला आहे, तरीही कामाला मुहूर्त मिळालेला नाही. रुग्णालयाने तब्बल आठवेळा सार्वजनिक बांधकाम विभागाला स्मरणपत्रे पाठविली आहेत, पण त्यांनी बेदखल केली आहेत.जेवायचे कोठे?, अंघोळ कोठे करायची?रुग्णालयाच्या आवारात जागा मिळेल, तेथे रुग्णांचे नातेवाईक जेवणे आवरतात, झोपतात. सकाळी अंघोळ कोठे करायची? हादेखील प्रश्न असतो. नव्या अतिदक्षता विभागाच्या जिन्यात, आंतररुग्ण विभागाच्या पायऱ्यांवर, बाह्यरुग्ण विभागाच्या व्हरांड्यात रात्र काढावी लागते. धर्मशाळा नावालाच आहे. कधी एकदा रुग्ण बरा होतो आणि घरी जातो याची प्रतीक्षा नातेवाईक करत असतात. डॉक्टरांची विश्रांतीगृहे, औषध भांडार, शस्त्रक्रियागृहे, स्वच्छतागृहे यांचीही प्रचंड दुरवस्था आहे.
थंडीत, व्हरांड्यात, पायऱ्यांवर काढावी लागते रात्र, नातेवाईकांचे हाल; सांगली शासकीय रुग्णालयातील विदारक चित्र
By संतोष भिसे | Published: February 06, 2023 6:12 PM