सांगली : जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांच्याशी सुरू असलेला ग्रामसेवकांचा संघर्ष अजूनही कायम आहे. येत्या २६ डिसेंबरपासूनच आडसूळ यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी ग्रामसेवक बेमुदत सामूहिक रजेवर जात आहेत. आंदोलनाच्या माध्यमातून होणारी अडवणूक खपवून घेणार नाही, असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी दिला आहे.जिल्ह्यातील ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांचा उपमुख्य कार्यकारी अधिकारी आडसूळ यांच्याशी वाद सुरु आहे. १५ डिसेंबरला होणारा मोर्चा त्यांनी रद्द करून मेळावा घेऊन जनतेची कामे करणार; मात्र प्रशासनाशी असहकार आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
आडसूळ यांच्यावर कारवाई होईपर्यंत आंदोलन मागे न घेता तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला. सीईओ राऊत यांनी ग्रामसेवक संघटना पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. चौकशी समिती नेमण्याचा निर्णय घेतला. चौकशी समितीत दोषी आढळल्यास संबधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले होते.
ग्रामसेवकांनी प्रशासनाशी असहकार सुरू असताना, पुन्हा ग्रामसेवक संघटनांनी निर्णय बदलला आहे. याबाबत गायकवाड म्हणाले, संघटनेची बैठक झाली असून, त्यामध्ये मोर्चा हिंसक होईल, असे सांगत मोर्चास परवानगी नाकारण्यास पोलिसांना भाग पाडले. त्यामुळे ग्रामसेवक दुखावले आहेत. सदस्य, पदाधिकाऱ्यांना विनंती केली असतानाही, सभेत या विषयावर चर्चा केली नाही.