सांगली : पाच हजाराच्या खंडणीसाठी विश्रामबाग येथील हसनी आश्रममधील मिना राजेंद्र तादडे (वय ४२) या हॉटेलचालक महिलेस धमकावून हॉटेलमधील कर्मचाऱ्याना धक्काबुक्की करुन जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी तिघांविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश पाटील, त्याचे मित्र आकाश व योगेश (पूर्ण नावे निष्पन्न नाहीत) अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. मिना तादडे यांचे हसनी आश्रममध्ये महालक्ष्मी हे हॉटेल आहे. बुधवारी रात्री गणेश पाटील मित्रासह हॉटेलमध्ये गेला होता. त्याने मिना तादडे यांच्याकडे दिवाळीसाठी पाच हजार रुपये खर्चाला देण्याची मागणी केली.
मी कोण आहे, हे तुला माहित नाही. पैसे नाही दिले तर जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली. त्यामुळे हॉटेलमधील कर्मचारी अमोल कोडग व संतोष भोसले त्यांना समाजावून सांगण्याचा प्रयत्न. त्यावेळी संशयितांनी कर्मचाऱ्याना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. त्यांनाही जिवे मारण्याची धमकी दिली.
हॉटेल व्यवसायातील चार हजाराची रोकडही गल्ल्यातून काढून घेतली. रात्री उशिरा मिना तादडे यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. संशयितांना अजून अटक करण्यात आली नाही.