सांगली : सर्वांसाठी घरे 2022 या संकल्पनेतून प्रत्येक कुटुंबाला पक्के घर असायला हवे, यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली आहे. ही योजना सांगली जिल्ह्यातील सांगली - मिरज - कुपवाड शहर महानगरपालिका तसेच इस्लामपूर, आष्टा, विटा, तासगाव, जत, पलूस नगरपरिषद तसेच, कडेगाव, शिराळा, खानापूर, कवठेमहांकाळ या नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात राबविली जात आहे. या योजनेच्या अनुषंगाने सर्व माहिती व कार्यपध्दती महानगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतीमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वि. ना. काळम-पाटील यांनी केले आहे.सन 2022 ला देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होत असून देशातील प्रत्येक कुटुंबाला जल जोडणी, शौचालय व्यवस्था, 24 तास वीज व पोहोच रस्ता या सुविधांसह पक्के घर असायला हवे, हे विचारात घेवून केंद्र शासनाने नागरी भागाकरिता प्रधानमंत्री आवास योजना सुरु केली आहे.
सर्वांसाठी घरे 2022 या संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजनेच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये जमिनीचा साधनसंपत्ती म्हणून वापर करुन त्यावरील झोपडपट्ट्यांचा आहे तेथेच पुनर्विकास करणे, कर्ज संलग्न व्याज अनुदानाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणे, खाजगी भागीदारीद्वारे परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांद्वारे वैयक्तिक स्वरुपातील घरकुल बांधण्यास अनुदान देणे या चार घटकांचा समावेश करण्यात आला आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वसाधारणपणे पुढीलप्रमाणे अटी लागू करण्यात आली आहे. घटक क्रमांक 1 साठी लाभार्थी म्हणून पात्रता महाराष्ट्र झोपडपट्टी अधिनियम, 1971 मधील तरतुदीनुसार राहील, उत्पन्न मर्यादा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांसाठी 3 लाखापर्यंत व अल्प उत्पन्न गटातील लाभार्थ्यांसाठी 3 लाख ते 6 लाखापर्यंत निश्चित करण्यात आली आहे.
या अभियानाअंतर्गत बांधण्यात येणारी घरे ही कुटुंबातील कर्त्या महिलेच्या किंवा कुटुंबातील कर्ता पुरुष व महिला यांच्या संयुक्त नावावर असतील. कर्ती महिला सदस्य नसेल, त्या ठिकाणी कर्ता पुरुषाच्या नावे घर राहील.
लाभार्थी कुटुंब म्हणूजे पती, पत्नी, अविवाहित मुले आणि अविवाहित मुली यांचा समावेश असेल. मात्र कमवता सदस्य तो विवाहित असो किंवा नसो, स्वतंत्र घरकुल मिळण्यास पात्र असेल. तसेच विवाहित जोडपे, एकाच्या नावावर किंवा संयुक्तपणे स्वतंत्र घरकुल मिळण्यास पात्र असेल.
या योजनेअंतर्गत अर्थसहाय प्राप्त करुन घेण्याकरिता, देशातील कोणत्याही भागात लाभार्थी कुटुंबातील व्यक्तीच्या मालकीच्या नावे पक्के घर नसावे. या योजनेअंतर्गत लाभार्थी पात्रता प्रधानमंत्री आवास योजना, सर्वासाठी घरे (नागरी) चया मार्गदर्शक सुचनानुसार राहील.