सांगली : बाहुबली महामस्तकाभिषेकसाठी राहूल गांधी यांना निमंत्रण, दिल्लीत समितीने घेतली भेट : सोहळ्याला उपस्थित राहण्याची ग्वाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 04:05 PM2018-01-11T16:05:18+5:302018-01-11T16:08:01+5:30
श्रवणबेळगोळ (कर्नाटक) येथे ७ ते २५ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक सोहळ्यासाठी समितीने दिल्ली येथे अखील भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांची भेट घेऊन निमंत्रण दिले. गांधी यांनीही या सोहळ्याला उपस्थित राहण्याची ग्वाही दिली आहे.
सांगली : श्रवणबेळगोळ (कर्नाटक) येथे ७ ते २५ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक सोहळ्यासाठी समितीने दिल्ली येथे अखील भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांची भेट घेऊन निमंत्रण दिले. गांधी यांनीही या सोहळ्याला उपस्थित राहण्याची ग्वाही दिली आहे.
कर्नाटकचे कॅबिनेट मंत्री ए. मन्जु, माजी केंद्रीय मंत्री प्रदीप आदित्य, मस्तकाभिषेक राष्ट्रीय समितीचे सचिव सुरेश पाटील, सहसचिव सतीश जैन, माजी पोलिस आयुक्त एस. के. जैन, राजेश खन्ना यांच्या शिष्टमंडळाने राहूल गांधी यांची दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेतली.
यावेळी सुरेश पाटील म्हणाले की, श्रवणबेळगोळ येथे यापूर्वी झालेल्या महामस्तकाभिषेक सोहळ्याला पंडीत जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांनी उपस्थिती लावली होती. दर बारा वर्षांनी होणाऱ्या या सोहळ्याची तयारी तीन वर्षापासून सुरू आहे.
या सोहळ्यात जैन समाजाचे देश-विदेशातील ८० ते ८५ लाख भाविक उपस्थित राहणार आहेत. दररोज ३० हजार भाविकांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. जैन समाजाला अल्पसंख्याक दर्जा प्राप्त करून देण्यात गांधी यांचा मोठा वाटा असल्याबद्दल त्यांचे आभारही मानले.
मंत्री ए. मन्जू यांनी या सोहळ्याला कर्नाटक शासनाने १७५ कोटीचा निधी दिला आहे. श्रवणबेळगोळ येथील प्राकृत विद्यापीठासाठी २० कोटी तर निवास व्यवस्थेसाठी ७५ कोटीचा निधी दिला असून वर्षभरापासून कर्नाटक शासन हा सोहळा पार पाडण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. यावेळी राहूल गांधी यांनी सोहळ्याच्या तयारीची माहिती घेत समितीचे निमंत्रण स्वीकारले व सोहळ्याला उपस्थित राहण्याची ग्वाही दिली.