कुपवाड : जिल्हा तालीम संघाच्या मान्यतेने आणि दत्ताअण्णा पाटोळे ग्रुपच्यावतीने शहरामध्ये घेण्यात आलेल्या कुस्ती मैदानात डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे आणि कोल्हापूरचा मल्ल संतोष दोरवड यांच्यात झालेली प्रथम क्रमांकाची दीड लाखाची कुस्ती बरोबरीत सुटली. या कुस्ती मैदानात कुस्ती शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या अशा सुमारे दीडशे लहान-मोठ्या चटकदार कुस्त्या झाल्या.शहरातील मिरज रस्त्यावरील पाण्याच्या टाकीजवळ असणाऱ्या मैदानात या कुस्त्या झाल्या. खो-खोची पंढरी असलेल्या या शहरात राष्ट्रवादीचे शहर जिल्हा उपाध्यक्ष दत्ता पाटोळे यांच्या नेतृत्वाखाली हे प्रथमच मोठे कुस्ती मैदान पार पडले.
या कुस्ती मैदानात खवसपूरचा मल्ल संतोष जगताप व कोल्हापूरचा मल्ल सरदार सावंत आणि इचलकरंजीचा मल्ल बाळू पुजारी व कुंभारीचा मल्ल भाऊसाहेब पाटील यांच्यात झालेल्या कुस्त्याही बरोबरीत सुटल्या. द्वितीय क्रमांकाची एक लाखाची, तर तृतीय क्रमांकाची एक्कावन्न हजाराची कुस्ती होती. या कुस्ती मैदानात लव्हाजी साळुंखे आणि सुशांत जाधव यांच्यातील लढतीत लव्हाजी साळुंखे याने घुटना डावावर जाधवला अस्मान दाखविले, तर गणेश तांबवे आणि नितीन कोळेकर यांच्यातील लढतीत तांबवेने बाजी मारली.कुस्तीशौकीनांच्या डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या या दोन्ही कुस्त्यांबरोबरच आकाराम कोळेकर, किरण माने, नितीन माने, पांडुरंग माने, अजय कल्लाप्पा कोरे, सुनील निंबाळकर, विजय कारंडे, नितीन दुधाळ, दीपक नाईक, रावसाहेब सरगर या मल्लांनीही प्रतिस्पर्धी मल्लांना अस्मान दाखवित विजय मिळविला व शौकीनांची मने जिंकली.या कुस्ती मैदानात लहान-मोठ्या दीडशे कुस्त्या पार पडल्या. या कुस्ती मैदानाचे उद्घाटन राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, मनपाचे विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते, कमलाकर पाटील, नगरसेवक विष्णू माने, राहुल पवार, दत्ता पाटोळे यांच्याहस्ते करण्यात आले.
संयोजन वस्ताद दरीकांत रूपनर आणि अण्णा ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी केले. यावेळी राष्ट्रवादीचे पद्माकर जगदाळे, ताजुद्दीन तांबोळी, संदीप तुपे, सिद्राम दलवाई, अनिल पांढरे, माजी उपमहापौर मोहन जाधव, उत्तमराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.