सांगली : दैनंदिन जीवनव्यवहारांमध्ये सामाजिक माध्यमांचा वापर अपरिहार्यपणे वाढला आहे. तंत्रज्ञानाच्या सहज उपलब्धतेमुळे समाजविघातक ठरू शकणाऱ्या फेक न्यूजचा प्रसार सहजतेने व मोठ्या प्रमाणात होत आहे. सामाजिक सलोखा नष्ट करण्यास कारणीभूत ठरणाऱ्या फेक न्यूजचा शोध घेवून त्यांना वेळीच रोखणे गरजेचे आहे. समाज माध्यमांवरील फेक न्यूज रोखणे जरी अवघड असले, तरी त्या शेअर न करता त्यांना प्रतिबंध करणे शक्य आहे. प्रत्येकाने या माध्यमांचा वापर करत असताना, सामाजिक जाणीव ठेवून ती अधिक सजगपणे वापरावीत, असे प्रतिपादन कोल्हापूर विभागाचे माहिती उपसंचालक सतीश लळीत यांनी येथे केले.जिल्हा माहिती कार्यालय सांगली आणि जिल्हा सायबर पोलीस ठाणे सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने फेक न्यूज परिणाम आणि दक्षता या विषयावर पत्रकार व प्रसारमाध्यमांसाठी आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. पोलीस अधीक्षक कार्यालयातील सभागृहात झालेल्या या कार्यशाळेस सायबरतज्ज्ञ विनायक राजाध्यक्ष, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक युवराज मोहिते, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, माहिती अधिकारी संप्रदा बीडकर आदि उपस्थित होते.उपसंचालक सतीश लळीत म्हणाले, पारंपरिक मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे यांच्यानंतर तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे नवमाध्यमांचा उदय झाला. पारंपरिक माध्यमांच्या तुलनेत नवमाध्यमांमधील संदेशांच्या विश्वासार्हतेवर नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अनेक समाजविघातक घटनांसाठी सामाजिक माध्यमांतून पसरणाऱ्या फेक न्यूज कारणीभूत होत आहेत.
माहितीची शहानिशा न करता फॉरवर्ड केल्या जाणाऱ्या अनेक संदेशांमधून अनेकदा अफवा पसरवल्या जातात. त्यातून मानवी संवेदना, सहवेदना, सहनशीलता, सामाजिक सलोखा यावर आघात होऊन अनेकदा कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होताना दिसतो. हे सर्व टाळायचे झाल्यास सहज उपलब्ध तंत्रज्ञानाचा वापर सद्सद्विवेकबुद्धीने कसा करायचा, याबद्दल मोठ्या प्रमाणावर जाणीवजागृती होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांनी फेसबुक, ट्विटर, इन्टाग्राम, व्हॉटस् ऍ़प यासारख्या सामाजिक माध्यमांमधून पसरविल्या गेलेल्या घटनांची अनेक उदाहरणे मांडली.सायबरतज्ज्ञ विनायक राजाध्यक्ष म्हणाले, सामाजिक माध्यमांतून माहिती फॉरवर्ड करण्याची संस्कृती उदयास आली आहे. अनेकदा मस्करीतून निर्माण झालेल्या घटनांनी गंभीर स्वरूप धारण केले आहे, असे सांगून प्रत्येकाने पोस्ट फॉरवर्ड करताना माहितीची सत्यता पडताळून पाहावी. तपास प्रक्रियेमध्ये येणारी माहिती कोठून येते, याचा स्त्रोत शोधणे अनेकदा सर्व्हिस प्रोव्हायडरवर अवलंबून असते.
त्यांचा प्रतिसाद मिळाल्यास फेक न्यूज संदर्भातील कारवाईलाही गतिमानता येईल. फेक न्यूज कोणत्या कारणाने वापरली गेली आहे, यावर तिच्याबाबतची शिक्षा अवलंबून असते, असे सांगून त्यांनी फेक न्यूज कशा शोधाव्यात, त्यांना आळा कसा घालावा, याबाबत कोणत्या कायद्यान्वये कारवाई करण्यात येते, आदिंबाबतची माहिती दिली.पोलीस निरीक्षक युवराज मोहिते म्हणाले, चुकीची माहिती फॉरवर्ड केल्याने समाजाचे नुकसान होते. पत्रकार हा समाजमनाचा आरसा असतो. त्यामुळे फेक न्यूजला आळा घालण्यासाठी आणि समाजात दुही निर्माण होणार नाही, यासाठी नवीन पिढीने अफवांना बळी पडू नये. समाजात कायदा व सुव्यवस्था राहण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी रवींद्र कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांनी स्वागत केले व आभार मानले. सूत्रसंचालन संप्रदा बीडकर यांनी केले. यावेळी मुद्रित माध्यमांचे पत्रकार व इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.