अविनाश कोळीसांगली : राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेदरम्यान होणाऱ्या सभांमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या उंदीर घोटाळ्यावरील भाषणाची चित्रफीत दाखविण्यात येत आहे. खडसेंच्या या चित्रफीतीतून आंदोलनाला धार देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी नेत्यांनी सुरू केला असून त्यांच्या या प्रयोगाला प्रतिसाद मिळत आहे.भाजपअंतर्गत वादाचा फायदा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उचलण्यास यापूर्वीच सुरुवात केली आहे. एकनाथ खडसेंमुळे त्यांचेच सरकार अडचणीत येत आहे. खडसे अणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील छुपा संघर्ष सर्वांना ज्ञात असला तरी हा संघर्ष विरोधकांच्या पथ्यावर पडू लागल्याचे दिसते. मंत्रालयातील उंदीर मारण्याच्या योजनेचा घोटाळा खडसेंनी बाहेर काढला. त्यावेळीही विरोधी पक्षांनी खडसेंना साथ दिली.
भाजपच्याच शस्त्राने भाजप सरकारवर वार करण्याची ही नामी संधी विरोधकांनी सोडली नाही. त्यातही कॉंग्रेसपेक्षा राष्ट्रवादी नेत्यांनी यावरून सरकारला कोंडीत पकडण्याचा सर्वाधिक प्रयत्न केला. आता त्यापुढे जाऊन राष्ट्रवादीने राज्याच्या कानाकोपऱ्यात खडसेंचे भाषण आणि सरकारचा कारभार पोहचविण्याची रणनिती आखली आहे.डिसेंबरपासून राष्ट्रवादीने राज्यभर हल्लाबोल आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात सभा, पदयात्राही घेण्यात येत आहेत. सभांची नेहमीची पद्धत मोडून चित्रफीतीद्वारे अनेक गोष्टी जनतेसमोर मांडण्याचा नवा फंडा त्यांनी शोधला आहे.
भाजप नेत्यांचे बदललेले रंग दाखविण्यासाठी पूर्वीच्या आणि आताच्या भाजप नेत्यांच्या भाषणाच्या चित्रफीती त्यांनी संकलीत केल्या आहेत. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चित्रफीती यात अधिक आहेत. याशिवाय या चित्रफीतींमध्ये सर्वाधित लक्षवेधी ठरलेली चित्रफीत एकनाथ खडसेंची आहे.
उंदीर घोटाळ्यावर त्यांनी विधानसभेत केलेल्या भाषणाची ही चित्रफीत राष्ट्रवादीच्या सभांमधून दाखविण्यात येत आहे. त्याला प्रतिसाद मिळत असल्याचा अंदाज आल्यानंतर या गोष्टीस अधिक धार देण्यात येत आहे.
क्या हुआ तेरा वादाधनगर समाजाच्या एका कार्यक्रमास मुख्यमंत्री प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी फडणवीस भाषण करण्यास उठत असताना संयोजकांनी क्या हुआ तेरा वादा हे यादों की बारात चित्रपटातील गाणे लावले होते. ती चित्रफीतही दाखविण्यात येत असून यावर उपस्थितांत हशा पिकत आहे.
सांगलीतील मोदींच्या भाषणाची चित्रफीतसांगली करू चांगली असा वाक्यप्रयोग करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी सांगलीत केलेल्या भाषणाची चित्रफीत दाखवून त्याचा समाचा जयंत पाटील सभेत घेताना दिसत आहेत.