सांगली : अलमट्टी धरणाची उंची सध्या ५१९.६० मीटर असून, ती ५२४.२५ मीटर करण्यासाठी कर्नाटक सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. उंची वाढविल्यास कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला महापुराचा धोका आहे. यामुळे उंची वाढवू नये, अन्यथा दि. १० नोव्हेंबरला सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात बंद पाळण्यात येईल, असा इशारा सर्वपक्षीय कृती समितीने दिला आहे. दि. १९ ऑक्टोबररोजी होणाऱ्या महापालिका सभेत उंची वाढविण्यास विरोधाचा ठराव करण्याच्या मागणीचा निर्णय झाला.
येथे झालेल्या बैठकीस माजी आमदार नितीन शिंदे, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष उमेश देशमुख, जलसंपदाचे सेवानिवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण, प्रभाकर केंगार, महेश पाटील, हेमंत गोताड, किरण कांबळे, सतीश साखळकर, डॉ. संजय पाटील, हणमंतराव पवार, आनंद देसाई, संजय कोरे, संदीप वायचळ, ज्योती अदाटे, कलगोंडा पाटील, उत्तम साखळकर, अभिमन्यू भोसले, भारती दिगडे, प्रमोद माने, उत्तमराव माने आदी उपस्थित होते.
अलमट्टी धरणाची उंची वाढवल्याने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात पूरसदृश्य समस्या निर्माण होणार आहेत. त्यामुळे उंची वाढवू न देण्यासाठी सर्वपक्षीय कृती समितीमार्फत आंदोलन करणार आहे. याचा भाग म्हणून सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना भेटून निवेदन देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री सुरेश खाडे यांना भेटून केंद्र सरकार आणि सर्वाेच्च न्यायालयात तीव्र विरोधाची भूमिका मांडावी, यासाठी निवेदन देण्यात येणार आहे. याबाबत प्रशासकीय पातळीवर ठोस पावले उचलली जावीत, यासाठी प्रयत्न करण्याचे ठरले आहे.
...तरच अलमट्टीची उंची वाढणार
अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचे काम सुरू करण्याआधी कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय व्हायला हवा. त्यानंतर लवादाचा निर्णय राजपत्रातून प्रकाशित व्हायला हवा, तरच उंची वाढविता येणे शक्य आहे. धरणाची उंची वाढविताना महाराष्ट्र सरकारचीही भूमिका सर्वोच्च न्यायालय, केंद्र सरकार जाणून घेणार आहे, असे मत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.