सांगली : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सांगली अजूनही चौकशीच्या ‘रडार’वरच आहे. राज्य दहशतवादविरोधी पथक सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात तळ ठोकून आहे. पथकाने शुक्रवारी मिरजेतही चौकशी केली. महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. पण तपासाच्यादृष्टीने कमालीची गोपनीयता बाळगली आहे.
मुंबईतील नालासोपाऱ्यात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडला. याप्रकरणी तीन संशयितांना अटक केली. त्यांच्या चौकशीतून एटीएसच्या पथकाला दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सचिन अंदुरे यास अटक करण्यात यश आले. सध्या शस्त्रसाठा व दाभोलकर यांच्या हत्येतील संशयित अटकेत आहेत. त्यांची स्वतंत्रपणे चौकशी सुरु आहे. या चौकशीतून राज्यभरातील अनेक संशयितांची नावे पुढे येत आहेत. यातील काही संशयित सांगली, मिरज व तासगाव येथील असल्याचे पुढे आले आहे.
याशिवाय कोल्हापूरही ‘कनेक्शन’ मिळाले आहे. त्यामुळे दोन दिवसापूर्वी एटीएसचे पथक सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात आले आहे. या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने तपासाला दिशा दिली आहे. स्थानिक पोलीस अधिकारी प्रसारमाध्यमांपासून दूर राहिले आहेत. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यात काय कारवाई केली जात आहे, याचा तपशील मिळू शकत नाही.
पथकाने गुरुवारी जिल्ह्यातील काही पुरोगामी नेत्यांशी संपर्क साधला. त्यानंतर तासगाव येथून दोघांना ताब्यात घेतले होते. त्यांना अजूनही सोडलेले नाही. पुरोगामी नेत्यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. पुरोगामी नेत्यांची नावे, त्यांचे आतापर्यंच्या चळवळीतील योगदान, याची सर्व माहिती पथकाने संकलित केली आहे. या नेत्यांना पोलीस संरक्षण घेतल्याशिवाय घराबाहेर पडण्यास मज्जाव केला आहे. यावरुन सांगली जिल्ह्यात या तपासाची पाळेमुळे खोलवर रुजली असण्याची शक्यता आहे. शुक्रवारी पथकाने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात चौकशी केली. मिरजेत एका वादग्रस्त संस्थेचे वसतिगृह असल्याने, त्याअनुषंगाने चौकशी केली. काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा उलगडा करण्यासाठीही सांगलीला चौकशीच्या ‘रडार’वर ठेवले आहे.सांगलीचे ‘कनेक्शन’गोव्यातील मडगाव बॉम्बस्फोट, कोल्हापुरातील ज्येष्ठ कामगार नेते गोविंदराव पानसरे यांची हत्या आणि नालासोपारा येथून जप्त करण्यात आलेला शस्त्रसाठा, या तीनही वेगवेगळ्या घटनांचे पुन्हा सांगली ‘कनेक्शन’ असल्याचे उघड झाले आहे. या घटनांचा छडा लावण्यासाठी एटीएस, एनआयए व स्थानिक पथक धडपडत आहे. परंतु अनेक संशयित गायब असल्याने या घटनांचे गूढ अजूनही कायम आहे.