सांगली : जिल्ह्यातील महापुराचे पाणी ओसरण्याची गती वाढली असून गेल्या चोवीस तासात चार फुटाने पाणी पातळी घटल्याने, अनेक रस्ते, वस्त्या महापुराच्या कवेतून सुटल्या आहेत, मात्र सांगली-कोल्हापूर आणि सांगली-इस्लामपूर हे प्रमुख मार्ग अद्याप सुरू झालेले नाहीत. कोयना व वारणा धरणातील विसर्ग अत्यंत कमी झाल्याने जिल्ह्यातील पूरस्थिती येत्या दोन दिवसात आटोक्यात येण्याची शक्यता आहे.
कोयना धरणातून सोमवारी सायंकाळी ३६ हजार ३१0 व वारणा धरणातून ७ हजार ५१३ क्युसेकपर्यंत विसर्ग कमी करण्यात आला आहे. एकीकडे कमी होत असलेला विसर्ग आणि अलमट्टीतून वाढणारा विसर्ग यामुळे कृष्णा व वारणा नद्यांच्या पाणी पातळीत गतीने घट होताना दिसत आहे. सांगलीच्या आयर्विन पुलाजवळील पाणी पातळीत गेल्या चोवीस तासात ४ फुटाने घट झाल्याने शहरातील अनेक रस्ते, वस्त्या जलमुक्त झाल्या आहेत. जिल्ह्यात व धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला असून, येत्या दोन दिवसात सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती आटोक्यात येण्याची चिन्हे दिसत आहेत. सांगली जिल्ह्यात सोमवारी बहुतांश भागात तुरळक पाऊस झाला. दिवसभर सूर्यदर्शन झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.