सांगली : कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरण व हिप्परगी बंधाऱ्यात पाणीपातळीचे नियम पाळले जात नाहीत. त्यामुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात महापूर आल्यास होणाऱ्या जीवित व मालमत्ता नुकसानीस दोन्ही जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी व पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना जबाबदार धरण्यात यावे, अशी नोटीस कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समिती (सांगली) व आंदोलन अंकुश, शिरोळ (जि. कोल्हापूर) यांच्या वतीने देण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभासी बैठक घेऊन केंद्रीय जल आयोगाच्या (सीडब्ल्यूसी) मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले. त्यानंतरही सांगली व कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी पुढे कोणताही कार्यवाही केलेली नाही. ‘सीडब्ल्यूसी’च्या नियमानुसार अलमट्टी धरणातील पाणीपातळीची उंची ३१ जुलैपर्यंत ५१३.६० मीटर आणि ३१ ऑगस्टपर्यंत ५१७ मीटर अपेक्षित आहे; परंतु अलमट्टी धरण व हिप्परगी बंधारा प्रशासनाकडून त्याची कार्यवाही होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.हिप्परगी बंधाऱ्याचे सर्व दरवाजे अद्याप उघडण्यात आलेले नाहीत. त्यामुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्याला पुराचा धोका होऊ शकतो. त्याबाबत दोन्ही जिल्ह्यांतील प्रशासन गंभीर नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कृष्णा महापूर कृती समिती सांगली व आंदोलन अंकुश शिरोळच्या वतीने ॲड. ओंकार वांगीकर यांनी दोन्ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना कायदेशीर नोटीस गुरुवारी पाठविली आहे.
सांगली, कोल्हापूरचा महापूर टाळण्यासाठी प्रशासनाला नोटीस
By हणमंत पाटील | Published: July 13, 2024 5:44 PM