सांगली : सांगली-कोल्हापूरदरम्यानच्यारेल्वेच्या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी चक्क लोहमार्गावरूनच पदयात्रा काढण्यात येणार आहे. बुधवारी (दि.११) रुकडी ते कोल्हापूरदरम्यान शेकडो रेल्वे प्रवासी रुळावरून कोल्हापूरला चालत जाणार आहेत.आंदोलनात रुकडी व गांधीनगरचे ग्रामस्थ, प्रवासी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. रुळावरून कोल्हापूरला जात आत्मक्लेष करणार असल्याची माहिती रुकडीचे माजी उपसरपंच ॲड. अमितकुमार भोसले यांनी दिली. रुकडी आणि गांधीनगर स्थानकांवर सर्व पॅसेंजर व एक्स्प्रेस गाड्या थांबाव्यात, सांगली ते कोल्हापूरदरम्यान अतिरिक्त पॅसेंजर गाड्या सोडाव्यात, या प्रवासासाठी तिकिटाचे दर कमी करा, रुकडी भुयारी मार्ग व रुकडी-इचलकरंजी उड्डाण पुलाच्या समस्या सोडवा, रुकडी स्थानकातील जुने तिकीटघर विकसित करा, अशा मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत.सांगली, मिरज ते कोल्हापूरदरम्यान रेल्वे प्रशासनाच्या मनमानी निर्णयांमुळे प्रवासी हैराण झाले आहेत. कोरोनापूर्वीच्या काही पॅसेंजर गाड्या पूर्ववत सुरू न केल्याने प्रवाशांची ससेहोलपट सुरू आहे. पॅसेंजरचे तिकीट शुल्क दुप्पटीने वाढविण्यात आले आहे. सांगली-कोल्हापूरदरम्यानचे काही थांबे रद्द केले आहेत. याविरोधात प्रवासी संघटनांनी वारंवार आंदोलने केली आहेत. पुणे विभागीय सल्लागार समितीच्या बैठकांतही सातत्याने आवाज उठविण्यात आला आहे, तरीही रेल्वे प्रशासन प्रवाशांचे हाल कमी करण्याच्या मानसिकतेत नाही. याच्या निषेधार्थ रुळावरून पदयात्रा काढली जाणार आहे.
सांगली, कोल्हापूरच्या रेल्वेप्रश्नी चक्क रुळावरून निघणार पदयात्रा, रुकडी-कोल्हापूरदरम्यान उद्या प्रवाशांचे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 2:24 PM