सांगली : कमी रुग्णसंख्या आणि मृत्यूदर अधिक असलेल्या जिल्ह्यांच्या विभागात सांगली व कोल्हापूर संयुक्तपणे राज्यात पहिल्या क्रमांकावर गेले आहेत. जास्त रुग्णसंख्या व जास्त मृत्यूदराच्या प्रकारात मुंबई, ठाणे व पुणे यांचा अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक लागतो. तरीही या जिल्ह्यांपेक्षा सांगली, कोल्हापूरचा मृत्यूदर अधिक आहे.
सांगली जिल्ह्यात गेली आठवडाभर दररोज सरासरी १५ बाधितांचा मृत्यू होत आहे. कोल्हापुरातील परिस्थितीही चिंताजनक आहे. कोल्हापुरात सोमवारअखेर ५७ हजार ७५१ लोकांना कोरोना झाला असून, १ हजार ९१७ बाधितांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्ह्यात सोमवारअखेर ६२ हजार ८७ जणांना कोरोना झाला आहे. यातील १ हजार ९५० बाधितांचा मृत्यू झाला आहे. कमी रुग्णसंख्या असताना मृत्यूदर अधिक असणाऱ्यांमध्ये हे दोन जिल्हे राज्यात आघाडीवर आहेत. त्याखालोखाल रत्नागिरी, सोलापूर, सातारा, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांचा क्रमांक लागतो.
मुंबई, ठाणे आणि पुण्यात कोरोना रुग्णसंख्या अधिक असून, त्यांचा मृत्यूदरही सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांपेक्षा कमी आहे. मुंबईचा २.५, ठाण्याचा १.३, तर पुण्याचा १.२ कोरोना मृत्यूदर आहे.
जास्त रुग्णसंख्या व जास्त रुग्ण बरे होण्याच्या गटात मुंबई (८२.४ टक्के), पुणे (८१.९ टक्के) व ठाणे (७९.४ टक्के) हे अव्वल आहेत.
चौकट
रिकव्हरी रेटमध्ये कोल्हापूर दुसऱ्यास्थानी
कमी रुग्णसंख्या असताना जास्त रिकव्हरी रेट (रुग्ण बरे होण्याचे प्रमाण) मध्ये बुलढाणा (९६.४ टक्के) पहिल्या स्थानी, तर कोल्हापूर (९०.१ टक्के) दुसऱ्यास्थानी आहे. यामध्ये सांगली जिल्हा सातव्या स्थानी असून, रिकव्हरी रेट ८५.८ टक्के आहे.
चौकट
राज्यात परभणी शेवटी
राज्यात रिकव्हरी रेटमध्ये परभणी जिल्हा सर्वात शेवटी आहे. रुग्ण बरे होण्याचे त्यांचे प्रमाण अवघे ५२.४ टक्के आहे. त्यानंतर भंडारा व गोंदिया शेवटून दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी आहेत.
चौकट
बुलढाणा, भंडाऱ्याचा मृत्यूदर सर्वात कमी
राज्यात सर्वात कमी म्हणजे ०.६ टक्के इतका मृत्यूदर बुलढाण्याचा नोंदला गेला आहे. त्यानंतर गोंदीया व भंडारा जिल्ह्याचा मृत्यूदर कमी आहे.