सांगली : सांगलीत कृष्णा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. रात्री उशिरापर्यंत पाण्याची पातळी ४५ फुटांवर पोहोचली होती. त्यामुळे शहरातील अनेक उपनगरे पाण्याखाली गेली आहेत. सूर्यवंशी प्लाॅट, मगरमच्छ काॅलनीतील नागरी वस्तीत पाणी शिरले आहे. नदीकाठावरील मंदिरे, स्मशानभूमी पाण्याखाली आहेत.
शहराला पुन्हा महापुराची धास्ती लागली आहे. दिवसभरात पावसाचा जोरही कायम होता. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत फुटाफुटाने वाढ होत होती. सकाळी ४० फुटांपर्यंत असलेली पाणीपातळी सायंकाळपर्यंत ४४ फुटांपर्यंत पोहोचली होती. रात्रीत सूर्यवंशी प्लाॅट, इनामदार प्लाॅट, काका नगर, दत्तनगर, मगरमच्छ काॅलनीत पुराचे पाणी शिरले होते.
सांगली- कर्नाळ रस्त्यावरील शेरीनाल्याचा पूल सकाळीच पाण्याखाली गेला होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद होती. टिळक चौकातील वैरण बाजारात पाणी शिरले होते. नदीकाठावरील स्वामी समर्थ मंदिरासह सर्वच मंदिरे पाण्यात बुडाली आहेत. अमरधाम स्मशानभूमीत पाणी शिरल्याने महापालिकेने अंत्यसंस्काराची सोय कुपवाड स्मशानभूमीत केली आहे. हरिपूर रस्त्यावरील नाल्यातही पाणी आले होते. जुना बुधगाव रस्ता, मल्टिपेक्स रस्ताही पाण्याखाली गेला आहे. वखारभागातील अनेक गॅरेजमध्ये पाणी आले होते. वखार भागातील वाहनतळही पाण्यात गेले होते. अनेक वाहने पुराच्या पाण्यात अडकली आहेत. सांगलीवाडीतील चिंचबागमध्ये पुराचे पाणी शिरले होते.
चौकट
हे रस्ते, वस्त्या पाण्याखाली
१. सूर्यवंशी प्लाॅट, इनामदार प्लाॅट, कर्नाळ रोड, काकानगर, दत्तनगर,मगरमच्छ काॅलनी, सिद्धार्थ परिसर, राजीव गांधीनगर, भारतनगर
२. सांगली -कर्नाळ रोड, जुना बुधगाव रोड, बायपास ते मल्टिपेक्स रोड पाण्याखाली
चौकट
शहरातील पाणीपुरवठा बंद
कृष्णा नदीपात्रातील महापालिकेच्या जॅकवेलला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. पुरामुळे पंपिंग स्टेशन बंद झाल्याने शहरातील पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे. महापालिकेकडून नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरविण्याचे नियोजन केले आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.
चौकट
२०० लोकांचे स्थलांतर
शहरातील सूर्यवंशी प्लाॅट, इनामदार प्लाॅट, कर्नाळ रोड, दत्तनगर, मगरमच्छ काॅलनीत पुराचे पाणी शिरल्याने २०० हून अधिक कुटुंबांनी स्थलांतर केले आहे. महापालिकेसह विविध संघटनांनी स्थलांतरणासाठी नागरिकांना मदत केली. महापालिकेच्या वतीने पूरग्रस्त नागरिकांसाठी निवाऱ्यांची सोय करण्यात आली आहे.