सचिन लाड / सांगली सांगली, मिरजेत गुंठेवारीतील तसेच मोक्याच्या ठिकाणच्या प्लॉटवर डोळा ठेवून लॅण्डमाफियांची टोळी कार्यरत झाली आहे. एकाच प्लॉटची अनेकांना विक्री करून सर्वसामान्यांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या या टोळ्यांनी धुमाकूळ घातला असून पोलीस आणि संबंधित शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी त्यांनी हातमिळवणी केल्याचे चित्र आहे. बेकायदेशीर व्यवहाराबाबत कोणी तक्रार करण्याचे धाडस केले तर, दहशतीच्या जोरावर त्याचे तोंड बंद केले जात आहे. यातून दिवसेंदिवस लॅण्डमाफियांची दहशत वाढत चालली आहे. महापालिका क्षेत्रात गुंठेवारीत मोठ्या प्रमाणावर प्लॉट उपलब्ध आहेत. अनेकांनी गुंतवणूक म्हणून प्लॉट खरेदी केले आहेत. मात्र खरेदीदार या प्लॉटकडे फिरकत नाहीत. गुंठेवारीतील प्लॉट खरेदी-विक्रीचा व्यवहार नोटरीद्वारे होतो. यामध्ये वटमुखत्यार व कब्जेपट्टीद्वारे नोंदणीकृत वकिलासमोर खरेदीचा दस्त केला जातो; मात्र प्रत्यक्षात गुंठेवारीतील प्लॉट असल्याने या खरेदी व्यवहाराची नोंद दुय्यम निबंधक कार्यालयात होत नाही. लॅण्डमाफियांची नेमकी याच नोंदणीकृत नसलेल्या प्लॉटवर नजर पडते. दिवसभर ते गुंठेवारी भागात फिरून प्लॉट कुणाचा आहे? याची चौकशी करतात. त्यानंतर ते खरेदी व्यवहाराचा दस्तऐवज उपलब्ध करून घेतात. त्याआधारे ते याच प्लॉटचा पुन्हा नव्याने बनावट दस्त तयार करतात. त्यानंतर प्लॉट विक्रीसाठी ग्राहक शोधला जातो. ग्राहक सापडला की, प्लॉटची किंमत ठरते. व्यवहार पक्का झाला की, ते तातडीने नोंदणीकृत वकिलासमोर वटमुखत्यार व कब्जेपट्टीद्वारे दस्त करून देतात.
सांगली, मिरजेत लॅण्डमाफियांच्या टोळ्या
By admin | Published: January 12, 2015 1:28 AM