सांगली : वातावरणात भरलेला उत्साह...हलगीचा कडकडाट... आणि घुमक्याच्या तालात सोमवारी वाघवाडीच्या नवतरुण मंडळाच्या तरुणांनी लेझीम स्पर्धा जिंकली. सांगलीच्या विसावा मंडळाच्या खेळाडूंनीही आपला वचक दाखवत या स्पर्धेत विभागून पहिला नंबर पटकावला. सोमवारी दिवसभर शांतिनिकेतनचा परिसर लेझीमच्या तालावर ठेका धरत होता.ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील यांच्या ८६ व्या स्मृतिदिनानिमित्त गेल्या सहा दिवस सुरू असलेला
कलामहोत्सव अर्थात कलाग्रामची सोमवारी शानदार सांगता झाली. सोमवारी कलाग्रामच्या शेवटच्या दिवशी लेझीम स्पर्धा पार पडल्या. एकूण ५० संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. लहान मुलांपासून ते ८० वर्षे वयाच्या वृध्दांपर्यंत सारेजण या स्पर्धेच्या निमित्ताने लेझीमच्या तालावर मनसोक्त नाचत होते. बुधगावचे ज्येष्ठ लेझीम खेळाडू किसन भगत-पाटील यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले. उदघाटन करुन हे तब्बल ९८ वर्षांचे किसन पाटील यांनी स्वत: उत्साहात लेझीम खेळायला सुरुवात केली. त्यांच्या लेझीमच्या तालावर सारे मैदान नाचायला लागले. यावेळी खंडेराजुरीचे सरपंच गजानन रुकडे, तुकाराम रुपनर आदी उपस्थित होते.
निकाल - प्रथम विभागून-नवतरुण मंडळ, वाघवाडी व विसावा मंडळ, सांगली, द्वितीय- उमाजी नाईक मंडळ, शिपूर व न्यू हनुमान मंडळ, समडोळी, तृतीय- राजमाता जिजाऊ मंडळ, टाकळी व हनुमान मंडळ, हिवतड, उत्तेजनार्थ- निनाई मंडळ, चिकुर्डे, झुंजार मंडळ, कुसाईवाडी, कर्नाळ हायस्कूल, गणपतराव वस्ताद मंडळ, बहिरेवाडी. उत्कृष्ट हलगी- अप्पासाहेब नाईक, घुमके- दिनकर खोत, कैताळ - जगन्नाथ लोहार
विठ्ठल धर्माधिकारी, संजय बामणे, प्रकाश हळेकर यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. मोहन कोळेकर, महेश पाटील, संजय चव्हाण, अनिकेत शिंदे, जीवन कदम, अभिषेक निकम, श्वेता साळुंखे, साईकलाम कोरबू, प्रकाश जाधव आदींनी या स्पर्धेचे संयोजन केले. मुख्य संयोजक संस्थेचे संचालक गौतम पाटील, अनुजा पाटील, राजेंद्र पोळ, इंद्रजित पाटील, बी. आर. पाटील आदींच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.९८ वर्षांचा तरुणलयबध्द ठेक्यावर ताल धरायला लावणाºया लेझीम स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे ९८ वर्षे वय असलेल्या किसन भगत पाटील यांनी अत्यंत चपळाईने लेझीम खेळून उपस्थितांना आश्चर्यचकित केले. जोपर्यंत पायात ताकद आहे तोवर हलगीचा कडकडाट ऐकला की लेझीम खेळतच राहणार, असा मनोदय यावेळी त्यांनी व्यक्त केला.