सांगली - Congress on Sangli ( Marathi News ) गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरून तिढा सुरू होता. याठिकाणी काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. परंतु जिल्ह्यात आज वेगळेच चित्र पाहायला मिळाले. महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी संजय राऊत, जयंत पाटील आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत हे तिन्ही पक्षाचे नेते एकत्र आले होते. त्यामुळे सांगलीमध्ये ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये मनोमिलन झाल्याची चर्चा सुरू झाली.
या बैठकीनंतर विक्रम सावंत यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, सांगली जिल्ह्यातील मविआचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी महाविकास आघाडीचे सगळेच घटक पक्ष इथं उपस्थित आहेत. अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरून जे आदेश आले, त्यानुसार मी इथे आलो. आघाडीचा धर्म आम्ही पाळणार आहोत. जी काही आधी प्रक्रिया झाली, त्यात ही जागा आम्हाला मिळावी यासाठी आम्ही प्रामाणिकपणे लढलो असं त्यांनी सांगितले.
तसेच विशाल पाटील यांच्या अर्जाबाबत जो काही निर्णय करायचा तो महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते निर्णय घेतील. सांगलीची जागा मिळावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता. त्या नाराजीतून काँग्रेस शब्द हटवला होता. आता नाराजी दूर झाली आहे. महाविकास आघाडीत जो काही आघाडीचा धर्म आहे तो काँग्रेसकडून पाळला जाईल असं जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांनी म्हटलं.
दरम्यान, अर्ज भरला म्हणून बंडखोरी केली असं नाही. विशाल पाटील आमच्या कुटुंबातलेच, राज्यात अनेक ठिकाणी असे अर्ज भरले गेलेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत आम्ही त्यांची समजूत काढू. महाविकास आघाडी एकच आहे. मविआतील ४८ जागांवर आम्ही तयारी केली होती. थोडेफार लोक नाराज होतात. पण आमच्या कुटुंबातील असून त्यांची नाराजी दूर करू असं विधान संजय राऊतांनी विशाल पाटील यांच्याबाबत केले.