Sangli Lok Sabha Election 2024 : सागंली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये विशाल पाटील यांनी बंडखोरी केली आहे. यामुळे आता काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. आज काँग्रेसनेसांगलीत कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात उपस्थित होते. यावेळी विश्वजीत कदम यांनी सांगली लोकसभेच्या जागेवरुन भाष्य केले. जागावाटपावरुन चर्चा सुरू होत्या त्यावेळचा घटनाक्रमच विश्वजीत कदम यांनी यावेळी सांगितला. "आता सांगली लोकसभेत आपण काँग्रेस पक्ष देईल तो आदेश पाळू असंही कदम म्हणाले.
कारस्थान करणाऱ्यांचा वचपा काढणार
विश्वजीत कदम म्हणाले, २०१९ ला मला लोकसभा लढवण्यासाठी सांगितलं, मी त्यावेळी नाही म्हणून सांगितलं. मला त्यावेळी विधानसभा लढायचं आहे सांगितलं. गेल्या तीन महिन्यापासून आम्ही सांगली लोकसभेची जागा काँग्रेसला मिळावी ही मागणी केली, आमच्या एका तरुण सहकाऱ्याला आम्ही तयार केलं. त्यांना मी खासदार करणार असा विश्वास दिला. तुम्ही सगळ्यांनी त्याला समर्थन दिलं. पण तीन महिने आम्ही तिकीट मागून काय झालं? सांगली जिल्ह्याची जागा काँग्रेसचीच आहे असं बैठकीत सांगितलं.म्हणून आम्ही सांगली जिल्ह्यात तयारी केली. नंतर आम्हाला सांगितलं कोल्हापूरची जागा काँग्रेसला दिली त्यामुळे सांगलीची जागा शिवसेनेला दिली. नंतर हातकणंगलेच्या जागेवर चर्चा सुरू झाली ती जागा शिवसेनेला दिली, राजू शेट्टी महाविकास आघाडीसोबत येणार अशा चर्चा सुरू झाल्या नंतर त्यांच्यात काय बिनसलं आम्हाला माहित नाही.
"यानंतर सांगलीवर चर्चा सुरू झाली. सांगली मुळची काँग्रेसची जागा आहे म्हणून आम्ही सांगत होतो, चर्चा सुरू असतानाच अचानक उद्धव साहेब सांगलीत आले आणि उमेदवारी जाहीर केली. लोकशाहीत असं होतं का? आम्हाला विचारलही नाही. ही जागा देण चुकीच होतं या मतावर मी आजही ठाम आहे. ही जागा तुम्ही दिली नाही हे मला माहित आहे. आमचा तुमच्यावर आरोप नाही. पण, त्यावेळी कोण काय करत होतं यावर का लक्ष नव्हत हा माझा सवाल आहे, असा टोलाही विश्वजीत कदम यांनी लगावला.
"सांगली जिल्ह्याच्या राजकारणात आम्हाला वसंतदादा, पतंगराव कदम यांचा वारसा मिळाला. पण, आमच एक दुर्देव पण आहे. आम्ही एकत्र आलो याला दृष्ट लागली. पण मला एक सांगायचं आहे दृष्ट लागलेली काढता पण येते. ती दृष्ट काढण्याची जबाबदारी मी एकटा घेणार, असा इशाराही विश्वजीत कदम यांनी दिला.
आमच्या भावना समजून घ्यायला पाहिजेत
विश्वजीत कदम म्हणाले, काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांनी प्रयत्न केले, पण काय झालं माहित नाही. आमच्या भावना समजून घ्यायला पाहिजेत. उमेदवार जाहीर झाल्यानंतर मला अनेकांनी प्रयत्न करण्याचा शब्द दिला. सगळीकडे मी माझ्या सहकाऱ्याला घेऊन गेलो. हे करत असताना काय झालं मला माहित नाही, अनेकांनी सांगितलं उमेदवारीच होत नाही. मागच्या दीड महिन्यात आम्ही उमेदवारीसाठी खूप कष्ट केलं. पण मी काँग्रेससाठी लढत होतो, राज्यात मी अनेक नेत्यांचा वाईटपणा घेतला.
विशाल पाटलांना अपक्ष लढू नको म्हणून सांगितलं
मला काँग्रेस नेत्यांकडून मार्ग काढण्यासाठी फोन येत होते, ते माझ्याकडे १७, १८ तारखेला माझ्याकडे आले. त्यावेळी मी त्यांच्यामागे होतो. काँग्रेस, शिवसेनेचे नेते राहुल गांधींशी बोलून आम्ही राज्यसभेची कबुली घेतली. तेव्हा मी त्यांना अपक्ष लढू नको म्हणून सांगितलं यात फसू नका. राज्यसभा वाईट नाही म्हणून सांगितलं. पुढच्यावेळी आपण जागा सोडायची नाही असं त्यांना सांगितलं.