महााविकास आघाडीत सांगली लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटला आहे. हा मतदारसंघ ठाकरे गटाला सोडण्यात आला आहे. दरम्यान, आता काँग्रेसचेविशाल पाटील बंडखोरी करणार की पैलवान चंद्रहार पाटील यांचा प्रचार करणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. महाविकास आघाडीतील या निर्णयानंतर सांगली काँग्रेसमधील कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. विशाल पाटील यांच्याबाबत सोशल मीडियावर जोरदार स्टेट्स व्हायरल झाले आहेत.
आज महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेतली. यात सांगलीची जागा ठाकरे गटाकडे कायम असेल असं जाहीर केलं. यानंतर सोशल मीडियावर सांगली लोकसभेबाबत पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. या पोस्टमध्ये "आमचं काय चुकलं? आता लढायचं जनतेच्या कोर्टात "असं म्हटले आहे.
सांगलीत विशाल पाटील यांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाकडून पैलवान चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर विशाल पाटील नाराज होते. आता महाविकास आघाडीनेही ही जागा ठाकरे गटाला कायम ठेवल्यानंतर आणखी नाराजी वाढली आहे. उद्या सांगलीतील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत जो निर्णय घेण्यात येईल तो निर्णय कायम ठेवण्यात येणार आहे.
याबाबत सांगली काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांनी प्रतिक्रिया दिली. सावंत म्हणाले, हा झालेला निर्णय दुर्देवी आहे. आमच्या मेरीट प्रमाणे आम्ही ही जागा मागत होतो. या बैठकीत आम्ही कार्यकर्त्यांचे मत घेणार आहोत यानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करणार आहे, असंही सावंत म्हणाले. विशाल पाटील अपक्ष लढवणार की नाही याबाबत आम्ही दोन दिवसात ठरवणार आहे, असंही सावंत म्हणाले. जिल्ह्यातील ही लोकसभेची निवडणूक आहे त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते आणि नेते यांचे मत जाणून घेणार आणि यानंतर योग्य तो निर्णय घेणार आहे, असंही सावंत म्हणाले.
आज सकाळी महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाल्यानंतर सांगली काँग्रेसच्या कार्यालयासमोर शुकशुकाट आहे. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची गर्दी झाली आहे. विशाल पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करत अपक्ष निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.