Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदारसंघात उमेदवारीवरुन महाविकास आघाडीत तिढा वाढला आहे. काँग्रेसच्याविशाल पाटील यांनीही उमेदवारीवर दावा केला आहे. तर दुसरीकडे महाविस आघाडीमध्ये सांगलीची जागा ठाकरे गटाला मिळाली असून ठाकरे गटाने पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. विशाल पाटील यांनी आता अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आता सांगली भाजपमधील नाराजी समोर आली आहे. जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
काँग्रेस लोकांची दिशाभूल करण्याचं काम करतं; नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितलं
यामुळे आता भाजपाला सांगली लोकसभा मतदारसंघात झटका बसला आहे. या पाठिंब्यामुळे खासदार संजयकाका पाटील यांच्या अडचणी वाढल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून माजी आमदार विलासराव जगताप यांनी खासदार संजयकाका पाटील यांच्या उमेदवारीवरुन नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, आज माजी आमदार विलासराव जगताप यांनी विशाल पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
आज पत्रकार परिषद घेऊन भाजपाचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. आज माजी आमदार जगतापराव यांनी भाजपाला सदस्यत्वाचा राजीनामाही दिला आहे. यावेळी बोलताना माजी आमदार विलासराव जगताप म्हणाले, स्वाभिमानी कार्यकर्त्यांची मी बैठक घेतली. या बैठकीत मी त्यांची बाजू ऐकून घेतली. सर्वानुमते मी स्वत: विशाल पाटील यांना पाठिंबा देण्याचे धोरण जाहीर केले आहे. विशाल पाटील यांच्यासाठी कार्यकर्ते मनापासून काम करतील. यापुढे विशाल पाटील यांच्यासाठी ताकदीने काम करण्याचे कार्यकर्त्यांनी मान्य केले आहे, असंही माजी आमदार विलासराव जगताप म्हणाले.
'वंचित'नेही दिला पाठिंबा
दोन दिवसापूर्वी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनीही विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तर दुसरीकडे आज जगताप यांनीही पाठिंबा जाहीर केला आहे. विशाल पाटील यांनी लोकसभेचे दोन अर्ज घेतल्याचे बोलले जात आहे, यामुळे पाटील आता ही लोकसभा अपक्ष लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे.
माजी आमदार विलास जगताप हे जतचे माजी आमदार आहेत. जत तालुक्यात त्यांचा मोठा गट आहे. आता त्यांनी विशाल पाटील यांना पाठिंबा दिल्याने भाजपला मोठा धक्का बसणार असल्याचे बोलले जात आहे.
सांगली लोकसभेतील विधानसभा मतदारसंघ
२८१ - मिरज विधानसभा मतदारसंघ (भाजपचे आमदार)२८२ - सांगली विधानसभा मतदारसंघ (भाजपाचे आमदार)२८५ - पलुस-कडेगांव विधानसभा मतदारसंघ (काँग्रेसचे आमदार)२८६ - खानापूर विधानसभा मतदारसंघ (शिवसेनेचे आमदार)२८७ - तासगाव-कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघ (राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार)२८८ - जत विधानसभा मतदारसंघ (काँग्रेसचे आमदार )