Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून संजयकाका पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर महाविकास आघाडीतील ठाकरे गटाने पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या जागेवर आता काँग्रेसनेही दावा केला असून, आमदार विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांनी या जागेसाठी दिल्लीवारीही केली. यामुळे आता सांगली लोकसभा मतदारसंघातून विशाल पाटील बंडखोरी करणार की चंद्रहार पाटील यांचा प्रचार करणार, अशा चर्चा सुरू आहेत. दरम्यान, आज भाजपाचे खासदार संजयकाका पाटील यांनी महाविकास आघाडीला डिवचलं आहे.
काँग्रेसकडून आंध प्रदेशात ५ उमेदवार जाहीर; मुख्यमंत्र्यांच्या बहिणीला उतरवलं मैदानात
"मी मतदारसंघात सातत्याने फिरतो. लोकांच्यातून चांगला प्रतिसाद आहे, लोकांनी निवडणूक हातात घेतली आहे. उद्या महाविकास आघाडीची बैठक आहे, या बैठकीत काय होईल मला माहित नाही. यात एकच उमेदवार असती, शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे. विशाल पाटील यांनी तिकीटाची मागणी केली आहे, तेव्हा उद्या काँग्रेस काही निर्णय घेईल. दोन्ही उमेदवार विरोधात आले तरी फक्त लिड कमी येईल. लोकांनी निवडणूक हातात घेतली आहे त्यामुळे आमची बाजू वरचढ आहे, असंही खासदार संजयकाका पाटील म्हणाले.
"निवडणुकीच्या निमित्ताने त्यांना मैदानात येऊ दे मग मी त्यांच्या प्रश्नांची उत्तर देतो. ३५ वर्षे त्यांच्याकडे खासदारकी होती. स्टाईल मारुन भाषणं केली म्हणून लोक स्विकारतात असं नाही, असा टोलाही संजयकाका पाटील यांनी लगावला.
"माझ्यादृष्टीने कोण विरोधक आहे यावर निवडणूक नाही, मी केलेले काम याची फक्त उजळणी करायची आहे, मी आता विशाल पाटलांना सांगतो तुम्ही फक्त मैदानातून पळ काढू नका. जर तुम्हाला सहानभुती मिळाली असं वाटतं असेल तर एकदा लोकांच्यात जाऊन निवडणूक आजमावूया, असंही संजयकाका पाटील म्हणाले.
"चंद्रहार पाटील एक चांगले पैलवान"
पैलवान या महायुतीचे उमेदवार आहेत, ते एक चांगले पैलवान आहेत. त्यांनी महाराष्ट्र केसरी म्हणून दोनवेळा लौकीक मिळवला आहे. ते समाजकारणात काम करायचं म्हणून आले आहेत. निश्चितपणाने मी या सगळ्या गोष्टींचं स्वागत करतो, असंही संजयकाका पाटील म्हणाले.