अब की बार, 'वेगळाच' उमेदवार! ४४ वर्षांनंतर सांगलीत 'वसंतदादा' घराण्यातील शिलेदाराविना निवडणूक
By संतोष कनमुसे | Published: April 9, 2024 05:27 PM2024-04-09T17:27:18+5:302024-04-09T17:33:42+5:30
सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसकडून विशाल पाटील यांनीही उमेदवारीसाठी दावा सांगितला होता.
संतोष कनमुसे
सांगली लोकसभा मतदारसंघ म्हणजे एकेकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला. सुरुवातीपासूनच या मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व होतं. १९८० पासून वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातील उमेदवार या मतदारसंघात निवडून येत आहेत. पण, २०१४ च्या मोदी लाटेत सांगली लोकसभा मतदारसंघावर भाजपाने विजय मिळवला. २०१४ आणि २०१९ सलग दोन वेळा भाजपाच्या संजयकाका पाटील यांनी काँग्रेसचा पराभव केला. आता २०२४ च्या निवडणुकांचे वारे वाहू लागले असून उमेदवारही जाहीर झाले आहेत. महाविकास आघाडीत सांगली लोकसभेचा तिढा आज सुटला. तब्बल ४४ वर्षांनंतर वसंतदादा पाटील यांच्या घराण्याशिवाय सांगली लोकसभा मतदारसंघातील निवडणूक होणार आहे.
२०२४ च्या लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासूनच सांगली लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत तिढा सुरू झाला होता. सांगली लोकसभा मतदारसंघावर ठाकरे गटाने दावा सांगितला होता. पैलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारीही उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली होती. तर दुसरीकडे, काँग्रेसमधील आमदार विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांनी हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला असून हा आम्हीच लढवणार, असा पावित्रा घेतला होता. यावरून ठाकरे गट आणि सांगली काँग्रेस नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली होती.
आमदार विश्वजीत कदम, विशाल पाटलांची दिल्लीवारी
सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडेच राहावा, या मागणीसाठी आमदार विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांनी दोन वेळा दिल्लीवारी केली होती. यावेळी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, के.सी वेणुगोपाल यांची भेट घेतली होती. ही जागा काँग्रेसकडेच राहावी अशी मागणी त्यांनी केली होती. पण, तरीही काँग्रेसने ही जागा ठाकरे गटासाठी सोडली आहे. दरम्यान, आता विशाल पाटील बंडखोरी करणार का, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
१९८० पासून सांगली लोकसभेवर वसंतदादा घराण्याचे वर्चस्व
१९८० नंतर सांगली लोकसभा मतदारसंघावर माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील घराण्याचं वर्चस्व होतं. वसंतदादा पाटील चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्याशिवाय, राजस्थानचे राज्यपाल, अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीसपदही त्यांनी सांभाळलं होतं. यामुळे त्यांचं काँग्रेसमध्येही मोठं नाव होतं. वसंतदादा पाटील यांच्या काळात काही निवडणुकांची तिकिटं सांगली काँग्रेस भवनमधून ठरवली जात, असं जाणकार सांगतात. उमेदवारीसाठी राज्यातून नेत्यांची गर्दी होत असे.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातून स्वत: वसंतदादा पाटील, प्रकाशबापू पाटील, मदन पाटील, प्रतिक पाटील यांनी लोकसभेचं मैदान गाजवलं होतं. प्रतिक पाटील यांना केंद्रात मंत्रिपदाची संधीही मिळाली होती.
२०१४ च्या मोदीलाटेत पराभव
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून संजयकाका पाटील यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत वसंतदादा पाटील यांचे नातू माजी केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील यांचा पराभव झाला. यानंतर २०१९ च्या लोकसभेत विशाल पाटील यांनी स्वाभिमानीच्या शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढवली. या निवडणुकीतही भाजपाच्या संजयकाका पाटील यांनी त्यांचा पराभव केला.
दरम्यान, आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सांगली लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाला सोडण्यात आला आहे. यामुळे आता महाविकास आघाडीकडून पैलवान चंद्रहार पाटील विरुद्ध भाजपाचे संजयकाका पाटील अशी लढत होणार आहे. महाविकास आघाडीने आज पत्रकार परिषद घेऊन ४८ उमेदवारांची घोषणा केली. आता काँग्रेसचे विशाल पाटील बंडखोरी करणार, की पैलवान चंद्रहार पाटील यांचा प्रचार करणार, या चर्चा जोरदार सुरू आहेत.
विशाल पाटलांना २०१९ ला किती मत मिळाली?
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून निवडणूक लढवली. ही निवडणूक तिरंगी झाली होती. वंचित बहुजन आघाडीकडून आमदार गोपीचंद पडळकर यांनी निवडणूक लढवली होती, तर भाजपामधून खासदार संजयकाका पाटील मैदानात होते, या निवडणुकीत संजयकाका पाटलांना ५०८९९५ एवढी मत मिळाली होती. तर विशाल पाटील यांनी ३ लाख ४४ हजार ६४३ एवढी मत मिळाली होती.
सांगली लोकसभेतील ६ विधानसभा मतदारसंघ
२८१ - मिरज विधानसभा मतदारसंघ (भाजपचे आमदार)
२८२ - सांगली विधानसभा मतदारसंघ (भाजपाचे आमदार)
२८५ - पलुस-कडेगांव विधानसभा मतदारसंघ (काँग्रेसचे आमदार)
२८६ - खानापूर विधानसभा मतदारसंघ (शिवसेनेचे आमदार)
२८७ - तासगाव-कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघ (राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार)
२८८ - जत विधानसभा मतदारसंघ (काँग्रेसचे आमदार )