Sangli Lok Sabha Election- सांगली लोकसभा मतदारसंघावरुन महाविकास आघाडीमध्ये तिढा वाढला आहे. ठाकरे गटाने पैलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. तर दुसरीकडे, ही जागा काँग्रेसची असून काँग्रेसच ही जागा लढवणार असल्याचे विशाल पाटील आणि आमदार विश्वजीत कदम यांनी म्हटले आहे. आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सांगली दौऱ्यावर गेले आहेत. दरम्यान, विश्वजित कदम आणि विशाल पाटील काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत सांगली काँग्रेसचे पदाधिकारीही असल्याचे बोलले जात आहे.
मविआचा तिढा, काँग्रेस नेत्यांचं वेट अँन्ड वॉच; दिल्ली हायकमांडच्या आदेशाकडे लक्ष
महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरुन गेल्या अनेक दिवसापासून चर्चा सुरू आहेत. कोल्हापूरची जागा ठाकरे गटाने काँग्रेसला सोडली. जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच ठाकरे गटाने सांगलीच्या उमेदवारीची घोषणा केली. मागील आठवड्यात विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनी पक्षश्रेष्ठींची भेट घेतली होती. यानंतर त्यांनी मैत्रिपूर्ण लढतीचा प्रस्ताव काँग्रेसपुढे ठेवणार असल्याचे सांगितले होते.
"आज अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे साहेब यांची आम्ही भेट घेणार आहोत. आज सांगलीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची बैठक आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी आणि महाविकास आघाडीतील नेत्यांनी काँग्रेसच्या जागेबाबत आम्हाला सांगावं. लोकसभेच्या दृष्टीने बैठका सुरू होत्या, या बैठकीत अशोक चव्हाणही होते, या चर्चेत काय झाले चव्हाण साहेबांची काय भूमिका होती मला माहित नव्हतं. ही जागा काँग्रेसची आहे ती जागा आम्हाला मिळावी हीच माझी भूमिका आहे, असंही विश्वजित कदम म्हणाले.
"काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची भावना मांडण्याच काम करत आहे. विशाल पाटील यांनी अपक्ष लढावं की नाही हे आताच सांगणार नाही. काँग्रेसच्या नेत्यांचं मार्गदर्शन घेऊन निर्णय घेणार आहे, असंही विश्वजित कदम म्हणाले. शिवसेनेने काय फॉर्म्युला दिला आहे तो आज आम्ही वरिष्ठांकडून समजून घेऊ, असंही आमदार कदम म्हणाले.