सांगली : विधानसभेसाठी जय्यत तयारी करणारे वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांचे नावही लोकसभेसाठी इच्छुक म्हणून समोर आले आहेत. पृथ्वीराज पाटील यांच्याशी त्यांची उमेदवारीची स्पर्धा सुरू झाली असून येत्या आठवडाभरात उमेदवार निश्चित होईल, अशी माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी दिली.
पुणे येथे हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी लोकसभा निवडणुकीविषयी काँग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीस चव्हाण, हर्षवर्धन पाटील यांच्यासह आ. मोहनराव कदम, आ. विश्वजित कदम, माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, जयश्रीताई पाटील, विशाल पाटील, सांगलीचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, माजी आमदार सदाशिवराव पाटील आदी उपस्थित होते. इच्छुक म्हणून समोर आलेल्या प्रतीक पाटील व पृथ्वीराज पाटील यांच्याशी सुरुवातीला चव्हाण यांनी चर्चा केली. प्रतीक पाटील यांच्या गेल्या काही वर्षातील पक्षीय संपर्काचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यावेळी प्रतीक पाटील म्हणाले की, काहीजण माझ्याबद्दल अपप्रचार करीत आहेत. सातत्याने मी येथील लोकांशी संपर्कात आहे. त्यामुळे पक्षाच्या नेत्यांनी अशा गोष्टीवर विश्वास ठेवू नये.
पृथ्वीराज पाटील यांनी जिल्हा दौऱ्याचा दाखला देत, काँग्रेस व राष्टÑवादीचे सर्व नेते सोबत असल्याचा दावा केला. उमेदवारीसाठी दावेदारी करतानाच त्यांनी निवडून येण्याच्या शक्यतांचा आढावा घेतला. काँग्रेसचा बालेकिल्ला पुन्हा निर्माण करायचा असेल तर नवा उमेदवार म्हणून माझा विचार व्हावा, अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर विशाल पाटील यांनाही उमेदवारीबद्दल विचारणा करण्यात आली. त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. यापूर्वी त्यांना प्रदेशच्या नेत्यांनी उमेदवारीबद्दल विचारणा केली होती, त्यावेळी त्यांनी विधानसभेला इच्छुक असल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. तरीही पृथ्वीराज पाटील, प्रतीक पाटील यांच्याबरोबर विशाल पाटील, विश्वजीत कदम यांचेही नाव उमेदवारीसाठी चर्चेत आले आहेत.आठवड्यात निर्णय शक्य
पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले की, बैठकीचा तपशील व कोअर कमिटीच्या सदस्यांचे मत घेऊन येत्या आठवड्याभरात उमेदवारीबद्दलचा निर्णय घेतला जाणार आहे. कोणालाही उमेदवारी मिळाली तरी पक्षांतर्गत मतभेद टाळावेत. लोकसभेला फटका बसला तर त्याचे परिणाम विधानसभेलाही होणार असल्याने प्रत्येक नेत्याने याबाबतची काळजी घ्यावी, अशी सूचना त्यांनी दिली.