सांगली लोकसभा विशाल पाटील काँग्रेसच्या चिन्हावर लढणार?, मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 11:49 AM2024-03-23T11:49:35+5:302024-03-23T11:50:11+5:30
काँग्रेसच्या तिसऱ्या यादीची प्रतिक्षा..
सांगली : सांगलीलोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे. जिल्हा काँग्रेसचे नेते आक्रमक झाले असून, त्यांनी विशाल पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्याची मागणी मुंबईतील प्रदेश समितीकडे शुक्रवारी केली. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही सांगली जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांच्या भूमिकेला हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे सांगलीतून विशाल पाटील हे कॉंग्रेसच्या चिन्हावर मैत्रीपूर्ण लढत देण्याचा प्रस्ताव आहे.
गेल्या १५ दिवसांपासून सांगली लोकसभेच्या जागेवरून शिवेसना व काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे. शिवसेनेचे उद्धव ठाकरे व संजय राऊत यांनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना काही दिवसांपुर्वी शिवसेनेत पक्षप्रवेश देऊन उमेदवारी उमेदवारीचे संकेत दिले होते. यावेळी काँग्रेसने नाराजी व्यक्त केली. मिरजेत गुरुवारी सभा घेऊन उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांची लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली.
यामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस गट आक्रमक झाला आहे. काँग्रेसचे नेते व पलूस-कडेगावचे आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, जिल्हाध्यक्ष व आमदार विक्रमसिंह सावंत, शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील आदी नेत्यांनी प्रदेशच्या नेत्यांची भेट घेऊन काँग्रेसला उमेदवारी देण्याची मागणी केली.
कोणत्याही परिस्थितीत सांगली लोकसभेची जागा शिवसेनेला सोडणार नसल्याची ठोस भूमिका प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडे मांडली आहे. महाविकास आघाडीच्या दोन-तीन वेळा बैठका पार पडल्या. या बैठकीत सांगलीचा विषय चांगलाच गाजला. पण आघाडीतील सांगलीच्या जागावाटपावर तोडगा निघालेला नाही.
काँग्रेस सांगलीत लढणारच : विक्रमसिंह सावंत
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा निर्णय अद्याप झालेला नाही. तरीदेखील सांगलीत येऊन शिवसेनेच्या नेत्यांनी उमेदवार जाहीर केली आहे. यामध्ये आम्हाला विश्वासात घेतले नाही. पण ही बाब काँग्रेस प्रदेश समितीच्या निदर्शनास आणून काँग्रेसचे उमेदवार म्हणून विशाल पाटील यांची घोषणा करावी, यासाठी आग्रह धरणार आहे. कोणत्याही परिस्थितीत सांगलीत काँग्रेस लढणार असल्याचे जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसच्या तिस-या यादीची प्रतिक्षा ..
जिल्हातील नेते व पदाधिका-यांनी प्रदेश काँग्रेसकडे विशाल पाटील यांची उमेदवारी घोषित करावी, अशी मागणी केली आहे. शिवाय काँग्रेसच्या तिस-या यादीत विशाल पाटील यांचे नाव समाविष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या यादीची प्रतिक्षा करीत जिल्ह्यातील नेतेमंडळी मुंबईत तळ ठोकून आहेत.