सांगलीच्या आखाड्यात चंद्रहार पाटील चीतपट?; काँग्रेसनेच घेतली आघाडी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 08:44 AM2024-03-21T08:44:35+5:302024-03-21T08:49:27+5:30
महाविकास आघाडीतील सांगली लोकसभेचा तिढा मिटल्याचे बोलले जात आहे.
Congress ( Marathi News ) : देशात लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली असून सर्व पक्षांमध्ये जागावाटपावर चर्चा सुरू आहेत. एनडीए विरोधात देशात विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी सुरू केली. इंडिया आघाडीचे जागावाटप अजुनही झालेले नाही, काल काँग्रेसची एक बैठक झाल्याचे सांगण्यात येत आहे. या बैठकीत महाराष्ट्रातील जागावाटपाचा तिढा सुटल्याचे बोलले जात आहे. सांगली लोकसभेच्या जागेवरुन 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' पक्ष आणि काँग्रेसने या दोन्ही पक्षांनी दावा सांगितला आहे. शिवसेनेने पैलवान चंद्रहार पाटील यांना सांगली लोकसभेची तयारी करण्यास सांगितले होते, तर काँग्रेसचे विशाल पाटीलही तयारी करत होते, त्यामुळे सांगली लोकसभेची उमेदवारी कोणाला मिळणार याची चर्चा सुरू आहे.
अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून युगेंद्र पवार यांना घेराव; नेमकं काय घडलं?
दुसरीकडे, काल पैलवान चंद्रहार पाटील यांनी महाविकास आघाडी कोणाला उमेदवारी देईल त्यांचा प्रचार करणार असं जाहीर केले आहे. त्यामुळे आता सांगलीची जागा काँग्रेस लढवणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. याबाबत काल चंद्रहार पाटील यांनी माध्यमांशी बोलताना संकेत दिले आहेत.
चंद्रहार पाटील म्हणाले, पंधरा, वीस दिवसापूर्वी ही जागा कुणाला सुटणार हा निर्णय झाला आहे. खरतर महाविकास आघाडीत ज्या पक्षाला जागा मिळणार त्यांचा प्रचार मी करणार आहे. सांगली लोकसभेत महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येणार आहे. गेल्या दोन वर्षापासून मी लोकांच्या संपर्कात आहे. शेतकऱ्यांसाठी मोठी बैलगाडा शर्यत घेतली.महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभेसाठी जो निर्णय होईल त्या निर्णया बरोबर मी एक शिव सैनिक म्हणून राहणार आहे, असंही चंद्रहार पाटील म्हणाले.
२०१४ च्या आधी सांगली लोकसभा काँग्रेसकडेच होता
सांगली लोकसभेची जागा आता काँग्रेसला सोडली जाणार असल्याचे बोलले जात आहे. सांगली लोकसभेत २०१९ मध्ये भाजपचे संजय पाटील यांच्या विरोधात विशाल पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढले होते, या निवडणुकीत विशाल पाटील यांचा पराभव झाला होता. लोकसभा २०१४ च्या निवडणुकांआधी हा मतदारसंघ काँग्रेसकडे होता, विशाल पाटील यांचे बंधू प्रतिक पाटील हे या मतदार संघातून निवडून आले होते.२०१४ च्या लाटेत प्रतिक पाटील यांचा भाजपचे खासदार संजय पाटील यांनी पराभव केला होता.