'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 12:33 PM2024-04-27T12:33:19+5:302024-04-27T12:35:04+5:30
Vilasrao Jagtap : सांगलीतली लढत दिवसेंदिवस लक्ष्यवेधी होत चालली आहे. अशातच भाजपच्या माजी आमदाराने जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
Sangli Loksabha Election : सांगली लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार असल्याने सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष तिथं लागलं आहे. महायुतीचे संजयकाका पाटील, महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्याच ही लढत होणार आहे. काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने विशाल पाटील हे बंडखोरी करत निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र विशाल पाटील यांना उमेदवारी मिळू नये यासाठी जयंत पाटील यांनीच खेळी केल्याचा आरोप भाजपच्या माजी आमदाराने केला आहे.
सांगलीत भाजपकडून संजयकाका पाटील यांना उमेदवारी जाहीर होताच त्यांना पक्षातूनच विरोध सुरु झाला होता. यामध्ये सगळ्यात पुढे हे जतचे माजी आमदार विलास जगताप होते. संजयकाकांच्या उमेदवारीमुळे विलास जगताप यांनी पक्षाला रामराम केला. भाजपचा राजीनामा देताना विलासराव जगताप यांनी थेट काँग्रेसच्या विशाल पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला. त्यानंतर आता एका प्रचारसमभेदम्यान विलास जगताप यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि संजय राऊत यांच्यावर आरोप केले.
सांगलीतील काँग्रेसची जागा जाण्यामागे जयंत पाटील हे खलनायक होते असा गंभीर आरोप जतचे माजी आमदार विलास जगताप यांनी केला आहे. विशाल पाटलांच्या उमेदवारीबाबतही विलास जगताप यांनी जयंत पाटील आणि संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
" एक काळ असा होता जेव्हा वसंतदादा पाटील यांच्या खिशात सगळ्या महाराष्ट्राची तिकीटे होती. आणि आज त्यांच्याच नातवाला मुंबई, पुणे, नागपूर असे हेलपाटे घालावे लागत आहेत. ही अतिशय दुःखद घटना आहेत. या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन प्रमुख पक्ष आहेत. काँग्रेसवाले तिकीट मागत होते तर त्यांना डच्चू दिला गेला. या सगळ्या खेळी संजय राऊतांच्या माध्यमातून जयंत पाटील यांनी केल्या आहेत. वसंतदादा यांचे घराणे राजकाराणातून संपवण्याचा घाट या जिल्ह्यातील नेतृत्वाने घातला आहे, असा आरोप विलास जगपात यांनी केला.