सांगली : कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील वैशाली रामदास मुळीक (२१) या विवाहित महाविद्यालयीन तरुणीच्या खूनप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात सापडलेला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्रातील प्राध्यापक ऋषिकेश मोहन कुडाळकर (२६) हा अजूनही पोलिसांना गुंगारा देत पसारच आहे.
त्यानेच वैशालीचा खून केल्याचा दाट संशय आहे. दरम्यान भितीपोटी त्याचे कसबे डिग्रजमधील कुटूंब घराला कुलूप लाऊन रविवारी रातोरात गाव सोडून निघून गेले आहे.माधवनगर रस्त्यावरील शांतिनिकेतन लोकविद्यापीठात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे अभ्यास केंद्र आहे. याठिकाणी वैशाली पद्वीच्या (बी. ए.) द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. याच अभ्यास केंद्रावर ऋषिकेश कुडाळकर हा तासिका तत्वावर प्राध्यापक म्हणून कार्यरत होता.
अभ्यास केंद्राचे प्रत्येक रविवारी वर्ग भरतात. वैशाली रविवारी वर्गात गेल्यानंतर तिचा खून झाला. वैशाली व कुडाळकर वर्गात जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. साधारपणे दहा वाजून ४० मिनीटांनी हे दोघेही तिसऱ्या मजल्यावरील वर्गात जाताना दिसतात. पण काही वेळानंतर कुडाळकर एकटाच घाईगडबीने निघून गेल्याचेही कैद झाले आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण, गुंडाविरोधी पथक व संजयनगर पोलीस ठाण्यातील स्वतंत्र पथके कुडाळकरच्या मागावर आहेत. पण अजूनही त्याचा सुगावा लागलेला नाही. याप्रकरणी वैशालीच्या पतीने फिर्याद दिली आहे. यामध्ये अज्ञात कारणावरुन अज्ञाताने वैशालीचा खून केल्याचे म्हटले आहे.