लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाला राज्य शासनाने दि. २६ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या निर्णयामुळे सभापती दिनकर पाटील यांच्यासह संचालकांना आणखी सहा महिन्यांची लॉटरी लागली आहे. कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे पणन विभागाने हा निर्णय घेतला आहे.
सांगली बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत दि. २६ ऑगस्ट रोजी संपली होती. त्यानंतर संचालक मंडळास सहा महिन्यांसाठी म्हणजेच दि. २६ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ मिळाली होती. जानेवारीमधील शासन आदेशानुसार राज्यातील ज्या बाजार समित्यांच्या निवडणुका होणार आहेत, त्या दि. २४ जानेवारीपासून पुढील तीन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे सांगली बाजार समितीस पुढील मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव पणन संचालनालयाने शासनास सादर केला होता.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्य शासनाने बाजार समितीला आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. निवडणुका जाहीर झालेल्या बाजार क्षेत्रात काम करणाऱ्या कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्थांच्या निवडणुका दि. ३१ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. ही कारणे लक्षात घेऊन बाजार समितीस मुदतवाढ दिली आहे. ती दि. २६ ऑगस्टपर्यंत देण्यात आली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सभापती पाटील यांच्यासह संचालकांना मुदतवाढ मिळाल्याने उर्वरित अपूर्ण कामे मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला.
चौकट
संचालकांना सहा वर्षे संधी
सांगली बाजार समिती संचालक मंडळाची मुदत ऑगस्ट २०२० मध्ये संपणार होती. त्यापूर्वीच मार्चमध्ये कोरोनाचा फैलाव झाला. यामुळे शासनाने मुदतवाढ दिली. संचालक मंडळाला एक वर्षाचा जादा कालावधी मिळाला आहे. सर्वसाधारण संचालक मंडळाचा कालावधी पाच वर्षांचा असतो. पण, सध्याच्या संचालकांना सहा वर्षांची संधी मिळाली आहे.