म्हैसाळ : म्हैसाळ (ता. मिरज) येथील डॉ. माणिक व पोपट वनमोरे यांच्या कुटुंबाच्या आत्महत्येचा प्रकार गंभीर आहे. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी गृह विभागाकडे करणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी केले.आठवले यांनी आज, बुधवारी म्हैसाळ येथे सामुहिक आत्महत्या केलेल्या वनमोरे कुंटुबाच्या निकटवर्तीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी आयोजित शोकसभेत ते बोलत होते. आठवले यांनी घटनास्थळी पाहणी केली. या संपूर्ण घटनेची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षित गेडाम व मिरजेचे उपविभागीय अधिकारी अशोक वीरकर यांनी मंत्री आठवले यांना दिली.शोकसभेत आठवले म्हणाले, म्हैसाळ गावामध्ये खासगी सावकारी वाढली आहे. वनमोरे कुंटुबीयांनी कष्टातून संसार उभा केला होता. या आत्महत्यांच्या पाठीमागे नेमके काय कारण आहे, यांचा तपास पोलीस करत आहेत. वनमोरे कुटुंबीयांना ज्यांनी त्रास दिला, त्या सर्वांची नावे त्यांनी आत्महत्येपुर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये पोलिसांना मिळून आली आहेत. पोलिसांनीही सतर्कता बाळगत आरोपींना पकडले आहे. या प्रकरणात माझ्या विभागाच्या वतीने जितकी मदत करता येईल ती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी डॉ. माणिक वनमोरे यांचे चुलत बंधू अनिल वनमोरे, संजय वनमोरे, रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव विवेक कांबळे, नंदकुमार कांबळे, दिलीप दबडे, पप्पू वनमोरे, सागर वनमोरे, अमोल वनमोरे, स्वप्निल वनमोरे, योगेश वनमोरे, रवी वनमोरे, बाळू वनमोरे, धोंडीराम वनमोरे उपस्थित होते.
म्हैसाळ सामूहिक आत्महत्या प्रकरण: आरोपीवर कठोर कारवाईची मागणी करणार - केंद्रीय मंत्री आठवले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 6:26 PM