मिरज : मोडी लिपीच्या प्रसार आणि प्रचारासाठी मिरज महाविद्यालयातील इतिहास विभागामार्फत माजी आमदार प्रा. शरद पाटील यांना त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षातील पदार्पणाबद्दल मोडी लिपीतील मानपत्र देऊन गौरविण्यात आले. एखाद्या मान्यवर व्यक्तीला मोडी लिपीतून मानपत्र देण्याचा हा राज्यातील पहिलाच उपक्रम असल्याचा दावा महाविद्यालयाच्या इतिहास विभागाने केला आहे.प्रा. शरद पाटील यांनी नुकतेच अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. त्यानिमित्त वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रा.शरद पाटील यांचा हा अमृतमहोत्सव अभिनव पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय मिरज महाविद्यालयातील इतिहास विभागाने घेतला.
इतिहासविभाग प्रमुख डॉ. सुवर्णा पाटील यांनी मोडी लिपीतून मानपत्र देण्याची कल्पना मांडली. त्यासाठी त्यांनी शरद पाटील यांच्या कायार्चा गौरव करणारे मानपत्र अतिशय सुंदर शब्दात तयार केले.
मोडी लिपीतून एखाद्या मान्यवराला मानपत्र देण्याचा हा राज्यातील पहिलाच उपक्रम असावा, असे अमृतराव सुर्यवंशी यांनी यावेळी सांगितले. या अभिनव उपक्रमाचे आयोजन मिरज महाविद्यालयाच्या इतिहास विभागाने केले.