रेठरेधरण : देशाच्या सीमेचे रक्षण करतानाच देशांतर्गत तरुणांच्या अपघाती मृत्यूच्या घटना मानकरवाडी (ता. शिराळा) येथील एका लष्करी जवानाच्या जिवाला चटका लावून गेल्या. त्यामुळे हे वाढते अपघात टाळण्यासाठी त्याने येथील पाडळीवाडी फाट्यावर प्रत्येक वाहनांवर प्रबोधनपर स्टिकर्स चिकटवून जनजागृतीचा उपक्रम राबविला.
हैबतराव म्होप्रेकर असे या लष्करी जवानाचे नाव आहे. त्यांनी गावातील काही तरुणांना सोबत घेऊन हा उपक्रम राबविला. घरी कुणीतरी आपली वाट पाहतंय, अशा आशयाची स्टिकर्स त्यांनी बनवून घेतली. गाडी मस्तीत नाही, तर शिस्तीत चालवा, धोक्याच्या वळणावर ओव्हरटेक करू नका, नाही तर आयुष्य चुकीचं वळण घेऊ शकतं, असे संदेश दुचाकीस्वारांना देऊन प्रबोधनपर उपक्रम त्यांनी राबविला आहे.
वाहन चालविणाऱ्या युवा वर्गातील मुला-मुलींचा रस्त्यावरील चुकीमुळे अपघात होतो व त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ त्यांच्या आई-वडिलांवर येते. हा त्यांच्यासाठी सर्वांत दु:खद क्षण असतो. अशी वेळ कोणाही पालकांवर येऊ नये, या सामाजिक हेतूने मानकरवाडी येथील जवान हैबतराव म्होप्रेकर यांनी पाडळीवाडी फाटा येथे हा उपक्रम राबविला.
भावनात्मक वाक्यांची रेडियम स्टिकर सुमारे पन्नास दुचाकींना लावून, त्या दुचाकीस्वारांना लिंबू-सरबत दिले. यावेळी डॉ. सुनील पाटील, भालचंद्र म्होप्रेकर, सुभाष म्होप्रेकर, अथर्व म्होप्रेकर, हर्ष म्होप्रेकर, तनीषा म्होप्रेकर, विघ्नेश म्होप्रेकर, आर्यन म्होप्रेकर, शंतनू म्होप्रेकर, पराग धुमाळ, शौर्य मुळीक, प्रज्ञा मुळीक या चिमुकल्यांनी, तसेच सुनील म्होप्रेकर, ऋषी म्होप्रेकर, अजय म्होप्रेकर, प्रशांत म्होप्रेकर, गणेश काळे, सत्य धुमाळ यांनी या उपक्रमात भाग घेतला.अपघात केंद्रावरच उपक्रमशिराळा-शिरसी हा रस्ता धोकादायक बनला आहे. या रस्त्यावरील पाडळेवाडी फाटा परिसरात यापूर्वी अनेक अपघात घडले आहेत. अनेक मोटारसायकलस्वार अपघातात जखमी झाले आहेत. याबाबत जागरूकता घडविण्यासाठी हा उपक्रम अपघाताचे केंद्र बनलेल्या पाडळेवाडी फाट्यावर राबविण्यात आला.