लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहरामधील राम मंदिरांमध्ये बुधवारी पुजारी मंडळींकडून जन्मकाळ सोहळा, आरती, नित्यपूजा करून रामनवमी साजरी करण्यात आली. भाविकांसाठी मंदिरे बंद असल्याने मंदिरांच्या बाहेरूनच भाविकांनी रामनामाचा जप करीत नमस्कार केला.
सांगली, मिरजेतील शेकडो वर्षांची रामनवमीची परंपरा सलग दुसऱ्या वर्षी खंडित झाली. बुधवारी सांगलीतील पंचमुखी मारुती मंदिर, राम मंदिर, मिरजेतील मंदिरांमध्ये पुजाऱ्यांमार्फतच रामनवमी साजरी करण्यात आली. पंचमुखी मारुती मंदिरातील अमोल पुजारी यांनी सांगितले की, कोरोनामुळे यंदा मंदिरे बंद आहेत. मागील वर्षीही अशीच परिस्थिती होती. संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाशी बांधील राहून बुधवारी रामनवमी साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. पहाटेपासून आम्ही पुजारी मंडळींनीच नित्यपूजा व आरास केली. मंदिराच्या आतील बाजूस मूर्तीला व गाभाऱ्याला फुलांची आरास करण्यात आली. पाळणाही सजविण्यात आला होता. जन्मकाळावेळी पाळणा, आरती, भजन करून रामनवमी साजरी करण्यात आली. भाविकांची उणीव जाणवत होती, मात्र या परिस्थितीत काहीच करू शकत नाही. यंदाच्या हनुमान जयंतीचे कार्यक्रमही आम्ही रद्द केले आहेत. त्यावेळीही अशाच प्रकारे अंतर्गत औपचारिक पूजा, विधी होणार आहेत. भाविकांनी मंदिराकडे न येता घरांतूनच प्रार्थना करावी.
सांगलीतील राम मंदिर, मारुती मंदिर, मिरजेतील राम मंदिर, मठांमध्येही औपचारिक पूजाविधी करण्यात आला. अनेक भाविकांनी मंदिराबाहेरून दर्शन घेतले. गेल्या दोन वर्षांपासून सण, उत्सव, जयंतीच्या कार्यक्रमांपासून नागरिकांना दूर राहावे लागले आहे.