सांगली : गेल्या पंचवीस दिवसांपासून अडून बसलेल्या पावसाने सांगली, मिरज शहर व परिसरात गुरुवारी हजेरी लावली. दिवसभर ढगाळ वातावरण आणि अधुनमधून रिमझिम सरी असे वातावरण होते.सांगली जिल्ह्यातील बहुतांश भागात गेले पंचवीस दिवस पावसाने हजेरी लावली नसल्याने पेरण्यांची कामे रेंगाळली आहेत. मोठ्या पावसाची अपेक्षा व्यक्त होत असताना, पावसाने हुलकावणीच दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अजूनही चिंतेचे वातावरण आहे.
शिराळा आणि मिरज तालुक्यातील शहरी भागाचा अपवाद वगळता अन्यत्र समाधानकारक पाऊस झालेला नाही. गुरुवारी सांगली, मिरज, कवलापूर, बुधगाव, माधवनगर या परिसरात पावसाने हजेरी लावली. बुधवारी रात्रीही सरी पडल्या. गुरुवारी सकाळपासूनच अल्पशी विश्रांती घेत पावसाने हजेरी लावली आहे.सांगली जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद जून महिन्यात झाली आहे. त्यामुळे सर्वत्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात चांगल्या पावसाची चिन्हे आहेत.
मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तविला आहे. जिल्ह्यातील तापमानातही घट होत आहे. गुरुवारी जिल्ह्याचे सरासरी कमाल तापमान २८ अंश, तर किमान तापमान २१ अंश सेल्सिअस नोंदले गेले. तापमानात घट होत असल्याने गारठा जाणवत आहे. येत्या आठवडाभर तापमान असेच राहणार असल्याचा अंदाज आहे.