सांगली : विश्रामबाग येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील वसतिगृहात आत्महत्या केलेल्या अक्षता प्रवीण कोष्टी (वय १८, रा. गुरुवार पेठ, डफळापूर, ता. जत) या विद्यार्थिनीचा मोबाईल विश्रामबाग पोलिसांनी जप्त केला आहे. यामधील कॉल डिटेल्स व चॅटिंगची चौकशी केली जाणार आहे.अक्षता वालचंद महाविद्यालयात स्थापत्य अभियंता पदविकेच्या पहिल्या वर्षात शिकत होती. ती महाविद्यालयातील वसतिगृहात रहात होती. गुरुवारी सकाळी तिने खोलीत पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
पोलिसांनी खोलीची झडती घेतली. पण संशयास्पद काहीच सापडले नाही. तसेच आत्महत्या करण्यापूर्वी तिने चिठ्ठीही लिहली नव्हती. तिच्या नातेवाईकांकडे तसेच मैत्रिणींकडे चौकशी केली. मात्र त्यांनीही ह्यआम्हाला काहीच माहित नाही, असे सांगितले. त्यामुळे तिच्या आत्महत्येचे गूढ वाढले.
पोलिसांनी तिचा मोबाईल जप्त केला. तिचे कॉल डिटेल्स तसेच चॅटिंगची चौकशी केली जाणार आहे. तिला गेल्या दोन दिवसात कोणा-कोणाचे फोन आले? चॅटिंग करुन तिला कोणी धमकी दिली होती का? याची तपासणी केली जाणार आहे. हा मोबाईल सायबर क्राईम पोलीस ठाण्यात देण्यात आहे. येत्या आठ-दहा दिवसात तपासणीचा अहवाल येईल, असे पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील यांनी सांगितले.