सांगली : आम आदमी पक्षाच्या आमदारांवर निवडणूक आयोगाकडून झालेली कारवाई ही भाजप सरकारच्या दबावापोटीच झाली आहे, अशी टीका पक्षाचे नेते ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.
ते म्हणाले की, संसदीय सचिवपदी नियुक्त्यांची पद्धत ही देशभर सुरू आहे. लाभाचे पद असल्याच्या कारणावरून जर आपच्या आमदारांवर कारवाई होत असेल तर ती अन्य राज्यातील सत्ताधारी भाजप आमदारांवर का होत नाही, असा आमचा मुख्य प्रश्न आयोगाला आहे. यासंदर्भात आम्ही कारवाईला सर्वोच्च न्यायालयात आव्हानही देणार आहोत.
सरकारचा हस्तक्षेप असल्यानेच आयोगाने केवळ आम आदमी पक्षावर वक्रदृष्टी ठेवली आहे. भाजप सरकारला देशातील सर्वच महत्त्वाच्या यंत्रणा ताब्यात घ्यायच्या आहेत. ज्याप्रमाणे हिटलरने एकेक करीत सर्व संस्था ताब्यात घेऊन शेवटी लष्करही ताब्यात घेतले, त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वाटचाल सुरू झाली आहे.
सर्वोच्च न्यायालयातील बंडसुद्धा याच गोष्टीमुळे झाल्याचा संशय आहे. सरकारचा हस्तक्षेत अशा संस्थांमध्ये होऊ लागल्यानेच लोकशाही धोक्यात आली आहे. हे प्रकार थांबवायचे असतील तर लोकशाही मानणाऱ्या सर्व पक्ष, संघटनांना आणि लोकांना एकत्रीत यायला हवे.
निवडणूक आयोगाने आमदारांच्या अपात्रतेबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे देशात नवीन पायंडा पडला आहे. कोणतीही संस्था आता सरकारपासून अलिप्त राहिली नाही की काय, असा प्रश्न पडत आहे. एकीकडे आपने दिल्लीमध्ये शिक्षणात क्रांतीकारी पाऊल टाकले असताना महाराष्ट्रात शिक्षणाच्या दोऱ्या देशातील बड्या भांडवलदारांच्या हाती देण्याचे षडयंत्र रचले जात आहे.
या लोकांना पुरातन काळातील व्यवस्था पुन्हा आणायची आहे. शिक्षणावर ठराविक वर्गाचा अधिकार रहावा, यासाठी हे खेळ सुरू झाले आहेत. त्यामुळे सरकारची ही धोरणे आता सामान्यांच्या लक्षात आली आहेत.भाजपच्या अशाप्रकारच्या पापात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसुद्धा सहभागी आहेत. संविधान बचाव अभियान राबवू पाहणाऱ्या शरद पवारांनीच गेल्या अनेक वर्षात संविधान पायदळी तुडविले.
अजित पवारांना वाचविण्यासाठी त्यांची सध्या धडपड सुरू आहे. त्यामुळे ते सरकारविरोधात फारसे काही करू शकत नाहीत. स्वामीनाथन आयोग त्यांच्या काळात लागू का झाला नाही, याचे त्यांनी उत्तर द्यावे, असे ते म्हणाले.
कोरेगाव-भीमा दंगलीमागे षडयंत्रकोरेगाव-भीमा दंगलीमागे निश्चितच सरकारचे षडयंत्र असावे. सरकारला देशभर दंगलीच घडवायच्या आहेत. अशा गोष्टीतून त्यांना स्वार्थ साधायचा आहे, अशी टीका सावंत यांनी केली.