सांगली : लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म मान्यता व अल्पसंख्याक दर्जा, यासाठीचा लढा आणखी तीव्र केला जाणार आहे. लिंगायत समाजाच्या मोर्चानंतर आता मार्च महिन्यात होणाऱ्यां विधिमंडळ अधिवेशनावेळी मंत्रालयावर मोटारसायकल रॅलीने मोर्चा काढण्यात येणार असल्याचे लिंगायत समाज महामोर्चा समन्वय समितीचे अध्यक्ष विश्वनाथ मिरजकर व प्रदीप वाले यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.ते म्हणाले की, सांगलीत लिंगायत समाजाने विविध मागण्यांसाठी ३ डिसेंबर रोजी मोर्चा काढला. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. या लढ्याची पुढची दिशा ठरविण्यासाठी समन्वय समितीची बैठक झाली. या बैठकीत विधिमंडळावर मोटारसायकल मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कर्नाटकातील सरकारने लिंगायत समाजाला धर्ममान्यता व अल्पसंख्याक दर्जा देण्याचा ठराव करून केंद्र शासनाकडे शिफारस केली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनानेही केंद्राकडे शिफारस करावी, यासाठी या मोर्चाचे नियोजन केले जात आहे.
अधिवेशनापूर्वी दहा दिवस आधी सांगलीतून मोर्चाला सुरुवात होईल. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या तीन राज्यांतून २५०० किलोमीटरचा प्रवास करून अधिवेशनापूर्वी हा मोर्चा मुंबईत मंत्रालयावर येऊन धडकेल. त्यात पाच हजार मोटारसायकलस्वार सहभागी होतील. तसेच लिंगायत समाजाचे धर्मगुरूंचाही सक्रिय सहभाग असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी संजीव पट्टणशेट्टी, डी. के. चौगुले उपस्थित होते.
असा असेल मार्गसांगली, कवठेमहांकाळ, जत, विजापूर, कुडलसंगम, कलबुर्गी, बसवकल्याण, उदगीर, नांदेड, अहमदपूर, लातूर, तुळजापूर, सोलापूर, बार्शी, कपिलधारा, बीड, अहमदनगर, पुणे, नाशिक, कल्याण, ठाणे व मंत्रालय.
सांगलीत सभागृहलिंगायत समाजाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. लहान-मोठ्या कार्यक्रमांसाठी सभागृहही बांधण्यात येणार आहे. यात समाजाचे कार्यालय, दीडशे विद्यार्थ्यांना राहण्याची सोय, स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र, तसेच लिंगायत समाजातील बेरोजगार तरुणांना उद्योगाचे प्रशिक्षण देण्यासाठी केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.