सांगली : महापालिकेच्या विषय समिती सभापती निवडीच्या निमित्ताने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दिवाळीपूर्वीच आरोप-प्रत्यारोपाचे बॉम्ब फुटले. राष्ट्रवादीचे सदस्य भाजपच्या गळाला लागल्याने काँग्रेस उमेदवारांची कोंडी झाली. पण राष्ट्रवादीने पराभवाचे खापर काँग्रेसवर फोडले. तर काँग्रेसने राष्ट्रवादीवर फुटीचा आरोप केला. महापालिकेच्या समाजकल्याण व महिला बालकल्याण समिती सभापतींच्या शुक्रवारी निवडी पार पडल्या. महिला व बालकल्याण समितीत काँग्रेसच्या उमेदवार आरती वळवडे यांचा दोन मतांनी पराभव झाला. तर समाजकल्याण समितीमध्ये काँग्रेसच्या कांचन कांबळे यांनी माघार घेतली. यावर राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी समाजकल्याण समितीमध्ये कॉंग्रेसचा एक सदस्य असतानाही उमेदवारीसाठी हट्ट केला. पण भाजपशी हातमिळवणी करीत निवडणूक बिनविरोध केली.
काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेण्यापूर्वी राष्ट्रवादीशी चर्चाही केली नाही. भाजपच्या खासदारांनी कॉंग्रेस नेत्यांना पक्षप्रवेशाचे आवाहन केले होते. त्याची सुरवात कॉंग्रेसने महापालिकेपासून केली आहे, असा आरोप केला. कॉंग्रेसचे गटनेते संजय मेंढे यांनीही बागवान यांना प्रत्युत्तर दिले. मेंढे म्हणाले, निवडणूक लढून जिंकण्यासाठीच कॉंग्रेसने अर्ज भरले होते. समाजकल्याण समिती सभापती पदासाठी अर्ज भरण्यापूर्वी राष्ट्रवादीच्या गटनेते, सदस्यांशी चर्चा केली होती. त्यांनी अर्ज भरण्यास नकार दिला. त्यामुळे कांचन कांबळे यांचा अर्ज भरला मात्र राष्ट्रवादीच्या सदस्याचे गेल्या दोन दिवसांपासून संशयास्पद हालचाली सुरु होत्या. सभागृहातही उमेदवार कांबळे यांना त्याचा प्रत्यय आला. त्यामुळे त्यांनी परस्परच अर्ज मागे घेतला. काँग्रेस नेते अथवा आपण आदेश दिले नव्हते. एका कार्यक्रमात कॉंग्रेस नेत्यांनी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांचे कौतूक केले. याचा अर्थ आम्ही भाजपमध्ये गेलो असा होत नाही. ज्यांचा पक्ष सातत्याने फुटतो. ते कॉंग्रेसला काय शिकविणार? काँग्रेस एकसंघ होती व यापुढेही एकसंघ राहणार, असे स्पष्ट केले. एक सदस्य संपर्कात - भाजपसमाजकल्याण समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा एक सदस्य भाजपच्या संपर्कात होता, अशी कबुली नगरसेवक शेखर इनामदार यांनी दिली. समाजकल्याण समितीची निवडणुक बिनविरोध झाली. त्यामुळे या सदस्यावर भाजपला मतदान करण्याची वेळ आली नसल्याचेही त्यांनी सांगितले. इनामदार यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसच्या आरोपाला बळ मिळाले.