कुपवाड : महापालिका क्षेत्रातील औद्योगिक वसाहतीच्या प्रलंबित समस्यांबाबत महापालिकेच्या अधिकाºयांकडून सुरू असलेल्या दुर्लक्षपणाच्या धोरणाविरोधात गुरूवारी झालेल्या जिल्हा उद्योगमित्र समितीच्या बैठकीत उद्योजकांनी आक्रमक पवित्रा घेतला. उद्योजकांच्या तक्रारींचा गांभीर्याने विचार करून जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी मनपा अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरले. औद्योगिक वसाहतीमधील स्वच्छताविषयक समस्यांचा निपटारा आठ दिवसांत, तर इतर समस्या महिन्याच्या आत सोडविण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी मनपा अधिकाºयांना दिले.
जिल्हाधिकारी विजय काळम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी कृष्णा व्हॅली चेंबरच्या सभागृहात जिल्हा उद्योगमित्र समितीची बैठक पार पडली. यावेळी मनपा उपायुक्त सुनील पवार, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक नितीन कोळेकर, औद्योगिक महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारी स्वाती शेंडे, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बिडकर, कृष्णा व्हॅली चेंबरचे अध्यक्ष सतीश मालू, माजी अध्यक्ष शिवाजी पाटील, वसंतदादा औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष सचिन पाटील, मिरज असोसिएशनचे अध्यक्ष संजय अराणके, लघु उद्योग भारतीचे राज्य सरचिटणीस माधव कुलकर्णी प्रमुख उपस्थित होते.
सचिन पाटील यांनी, महापालिका प्रशासनाकडून महापालिका स्थापनेपासून औद्योगिक वसाहतीवर होत असलेल्या अन्यायाबाबत आवाज उठविला. यावेळी त्यांनी, औद्योगिक वसाहतीच्या क्षेत्रात मतदारांची संख्या नसल्यामुळे वसाहतीवर अन्याय होत असल्याचा महत्त्वपूर्ण मुद्दा उपस्थित केला. याप्रकरणी जिल्हाधिकारी काळम पाटील यांनी लक्ष घालून हे प्रश्न मार्गी लावावेत, अशी आग्रही मागणी केली. याबाबत उपस्थित असलेले उपायुक्त सुनील पवार यांना उद्योजकांबरोबरच जिल्हाधिकारी यांनीही प्रलंबित प्रश्नांबाबत जाब विचारला. उपायुक्तांनी, मनपा क्षेत्रातील औद्योगिक वसाहतीचे स्वच्छतेचे प्रश्न आठ दिवसांत मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. तसेच इतर महत्त्वाची मोठी कामे महिन्याभरात मार्गी लावण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी मनपा अधिकाºयांना दिले.
कुपवाड एमआयडीसीच्यावतीने कृष्णा व्हॅली चेंबरचे अध्यक्ष सतीश मालू व सचिव चंद्रकांत पाटील यांनी राज्य कामगार विमा महामंडळाच्या रुग्णालयाचा प्रश्न उपस्थित केला. याबाबत उद्योजकांकडून कोट्यवधी रुपयांची वसुली होऊनही राज्य कामगार विमा महामंडळ कामगार व त्यांच्या नातेवाईकांना योग्य त्या सोयी-सुविधा पुरवित नसल्याचा मुद्दा जिल्हाधिकाºयांकडे उपस्थित केला.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी कामगारांच्या जीवन-मरणाच्या प्रश्नाबाबतचे गांभीर्य ओळखून ३० आॅक्टोबरनंतर औद्योगिक संघटना आणि राज्य कामगार विमा योजनेच्या अधिकाºयांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्याची सूचना महाव्यवस्थापक कोळेकर यांना केली. याबरोबरच वाढीव विद्युत बिले आणि रस्त्याच्या मधोमध लावण्यात आलेल्या पथदिव्यांचा प्रश्न कृष्णा व्हॅली चेंबरचे उपाध्यक्ष रमेश आरवाडे यांनी उपस्थित केला. यावेळी उपस्थित महापालिकेचे विद्युत अभियंता अमर चव्हाण यांनी, येत्या आठ दिवसांत खांब हटविण्यात येतील, असे आश्वासन दिले.
उपायुक्तांची प्रामाणिक कबुली...महापालिका प्रशासनाकडून अनेक वर्षे प्रलंबित ठेवण्यात आलेल्या प्रश्नांची वेळोवेळी सोडवणूक होणे गरजेचे होते. परंतु या प्रश्नांची तीव्रता वरिष्ठ स्तरावरील अधिकाºयांपर्यंत पोहोचविली गेली नाही. याप्रकरणी आयुक्तांसमवेत लवकरच बैठक बोलावून प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी ठोस पावले उचलली जातील. तसेच विविध प्रकारच्या समस्यांबाबत नागरिकांचे बोलणे खाण्याची आमच्या अधिकाºयांना सवय झाली आहे, अशी प्रामाणिक कबुली यावेळी उपायुक्तांनी दिली. यापुढील काळात विविध प्रकारचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.
कुपवाड येथील कृष्णा व्हॅली चेंबरमध्ये जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ‘उद्योग मित्र’ची बैठक झाली. यावेळी सतीश मालू, शिवाजी पाटील, रमेश आरवाडे, पांडुरंग रूपनर उपस्थित होते.