सांगली : महापालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी ( 1 ऑगस्ट) सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या ७८ जागांसाठी हे मतदान होत आहे. सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीकाँग्रेस, भाजपा आणि शिवसेना यांच्यात तिरंगी लढत पहायला मिळत आहे.
सांगलीत मतदारांच्या स्वागताची प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. अनेक मतदान केंद्रांवर रांगोळ्या काढून, नारळाच्या झावळ्या-आंब्याच्या डहाळ्या लावून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. गुलाबपुष्प देऊन मतदारांचे स्वागत करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी जिमखाना मतदान केंद्रांवर सकाळी साडेसात वाजता मतदान केले.
आयुक्त तथा निवडणूक अधिकारी रवींद्र खेबुडकर हे हिंदू-मुस्लिम चौकातील शाळा नंबर १७ येथील मतदान केंद्रावर स्वतः मतदारांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून आवश्यक मतदान यंत्रांसह चोख व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर मतदान प्रक्रिया व्यवस्थित पार पाडावी यासाठी मोठा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.
सांगली : महापालिका निवडणूकप्रभाग - २०जागा - ७८उमेदवार - ५४१मतदान केंद्रे - ५४४मतदारांची संख्या - ४ लाख २४ हजार १७९पुरूष - २, १५,५४७महिला - २,०८,५९५इतर - ३७
Live Updates :
- सांगली-मिरज-कुपवाड महापालिका निवडणूक : दुपारी दीड वाजेपर्यंत सरासरी ३४ टक्के मतदान झाले
- सांगली-मिरज-कुपवाड महापालिका निवडणूक : ११.३० पर्यंत सरासरी २१ टक्के मतदान.
- सांगली : आमदार सुधीर गाडगीळ आणि आमदार सुरेश खाडे यांनी कुटुंबियांसह केले मतदान
- सांगली-मिरज-कुपवाड महापालिका निवडणूक : सकाळी 7-30 ते 9-30 या पहिल्या 2 तासात सरासरी 10 टक्के मतदान
- जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी सपत्निक मतदान केले.