सांगली : महापालिकेच्या प्रभाग १६ मधील पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. शुक्रवारी विरोधी पक्षनेते संजय मेंढे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने भाजप आमदारासह कोअर कमिटी सदस्यांची भेट घेऊन बिनविरोधसाठी साकडे घातले.
काँग्रेसचे नगरसेवक माजी महापौर हारुण शिकलगार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी सोमवार (दि. २९) पासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. काँग्रेसच्या वतीने हारुण शिकलगार यांचे चिरंजीव तौफिक यांची उमेदवारी निश्चित आहे. शुक्रवारी तौफिक शिकलगार, इरफान शिकलगार यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांनी जिल्हा बँकेच्या संचालिका जयश्रीताई पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. श्रीमती पाटील यांनी ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी विरोधी भाजपच्या नेत्यांशी चर्चा करण्याची सूचना केली. त्यासाठी विरोधी पक्षनेते संजय मेंढे, नगरसेवक संतोष पाटील, उत्तम साखळकर, मंगेश चव्हाण, माजी महापौर किशोर शहा, नामदेव चव्हाण अशा प्रमुख पदाधिकाऱ्यांची समिती स्थापन केली.
काँग्रेसच्या शिष्टमंडळाने भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांची शुक्रवारी भेट घेतली. निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर आतापर्यंतच्या निवडणुका बिनविरोध करण्याची परंपरा आहे. यापूर्वीही दोनदा निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. ही परंपरा भाजपने खंडित करू नये, असे साकडे घातले. कोअर कमिटीचे प्रमुख शेखर इनामदार, नीता केळकर, शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर, माजी आमदार दिनकर पाटील यांचीही कांँग्रेस शिष्टमंडळाने भेट घेतली. खासदार संजयकाका पाटील, मकरंद देशपांडे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करण्यात आली. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेण्याची ग्वाही शिष्टमंडळाला देण्यात आली.
भाजपची आज खणभागात बैठक
आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयात सायंकाळी कोअर कमिटीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठक झाली. काँग्रेसकडून आलेल्या बिनविरोधच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. आता शनिवारी खणभागात प्रभागातील पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या जातील. त्यानंतर काँग्रेसचा आलेला प्रस्ताव, भाजप कार्यकर्त्यांची मते प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कळविली जाणार आहेत. वरिष्ठ पातळीवरूनच पोटनिवडणुकीबाबत निर्णय होईल, असे कोअर कमिटीचे प्रमुख शेखर इनामदार यांनी सांगितले.