सांगली : महापालिकेने थकीत घरपट्टीपोटी दहा हजार मालमत्ता धारकांना जप्तीपूर्व नोटिसा बजाविल्या आहेत. तसेच शहरातील २५० मालमत्ताधारकांना जप्तीचे वॉरंट बजावले आहे. त्यांच्याकडे सुमारे एक कोटी ६० लाखांची थकबाकी असून सात दिवसात ती न भरल्यास त्यांच्या मालमत्ता जप्त करण्याचा इशाराही नोटिसीद्वारे दिला आहे. महापालिका आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्या आदेशाने घरपट्टी थकीत व चालू मागणी वसूल करण्यासाठी घरपट्टी विभागाने मोहीम हाती घेतली आहे.
आयुक्तांनी घरपट्टी विभागाला ५० कोटी रूपये वसूल करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. गेल्या अनेक वर्षापासून थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आली. यातील दहा हजार रूपयांपेक्षा जास्त थकीत रक्कम असलेल्या सुमारे १० हजार मालमत्ताधारकांना जप्तीपूर्व नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. त्यांनी मुदतीत थकबाकी न भरल्यास त्यांना जप्तीचे वॉरंट बजावले जाणार आहे. जप्तीचे वॉरंट बजावण्यासाठी ९ जणांची वॉरंट आॅफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
याबाबत कर निर्धारक व संकलक नितीन शिंदे म्हणाले, सांगलीतील २५० मालमत्ता धारकांना आता जप्तीचे वॉरंट बजावण्यात आले आहे. त्यांच्याकडे सुमारे १ कोटी ६० लाख रूपयांची थकबाकी आहे. या सर्वांना आता सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर मालमत्ता जप्तीची कायदेशीर प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. तेरा हजार घरांचा सर्व्हे पूर्णनितीन शिंदे म्हणाले, महापालिका क्षेत्रातील सर्व मालमत्तांचा सर्व्हे सुरु आहे. यामध्ये घरपट्टी, पाणीपट्टीसह विविध प्रकारचे पालिकेचे परवाने संबंधित मालमत्ता धारकांकडे आहेत का? याची माहिती संकलित करण्यात येत आहे. शहरातील १३ हजार मालमत्तांचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. हे काम डिसेंबरअखेरपर्यंत चालणार आहे.