सांगली : महापालिकेच्या महापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू ऑनलाईन पद्धतीने झाली. ७ नगरसेवक फुटल्यामुळे भाजपला धक्का बसला आहे. भाजपच्या पाच जणांनी राष्ट्रवादीला मतदान केले तर दोन नगरसेवक गैरहजर राहिले. महापौेर राष्ट्रवादीचा बनल्यामुळे भाजपला धक्का बसला आहे. भाजपची अडीच वर्षाची सत्ता संपुष्टात आली.
सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका महापौरपदी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिग्विजय सूर्यवंशी यांची महापौरपदी निवड झाली आहे. दिग्विजय यांना ३९ तर विरोधी भाजपचे उमेदवार धीरज सूर्यवंशी यांना ३६ मते पडली आहेत, उपमहापौर पदी काँग्रेसचे उमेश पाटील यांची निवड झाली. पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑनलाईन मतदान झाल्याने याबद्दल उत्सुकता होती.
भाजपची अडीच वर्षाची सत्ता संपुष्टात
- एकूण मतदार : ७८
- मयत सदस्य : १
- मतदार : ७७
- तटस्थ मतदार :२
- दिग्विजय सूर्यवंशी :३९
- धीरज सूर्यवंशी :३६
सांगली महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता सुरु झाली. त्यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली होती. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रियाही ऑनलाईन पद्धतीनेच झाल्याने असल्याने सभागृहात नगरसेवकांची उपस्थिती बंधनकारक नव्हती.
महापौर पदासाठी निवडणूकीत राष्ट्रवादीचे दिग्विजय सूर्यवंशी व भाजपचे धीरज सूर्यवंशी यांच्यात लढत होती. राष्ट्रवादीचे उमेदवार मैनुद्दीन बागवान यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला होता, पण दिग्विजय सूर्यवंशी यांचा अर्ज कायम ठेवला. पीठासन अधिकाऱ्यांकडून मतांची नोंदणी झाल्यानंतरच प्रकीया पूर्ण केली.
भाजपच्या विजय घाडगे, महेंद्र सावंत यांनी आघाडीला मतदान केले, तर स्नेहल सावंत, अपर्णा कदम, नसिमा नाईक या नगरसेवकांनी राष्ट्रवादीचे उमेदवार दिग्विजय सूर्यवंशी यांना मतदान केले. रईसा रंगरेज गैरहजर राहील्या. पीठासन अधिकाऱ्यांनी महापौर म्हणून दिग्विजय सूर्यवंशी यांना विजयी घोषित केले.
भाजपचे महापौर पदाचे उमेदवार धीरज सूर्यवंशी यांनी निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेतला असून जे उमेदवार ऑनलाइन दिसत नाही त्यांचे मतदान कसे होणार? ही प्रक्रिया बरोबर नाही अशा आरोप धीरज सूर्यवंशी यांनी केला आहे.कोरोनामुळे महापालिकेच्या महापौर, उपमहापौर निवडीची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे आदेश शासनाने दिले. त्यानुसार महापालिकेच्या मुख्य सभागृहात व्हिडीओ कॉन्फरन्सिंग व्यवस्था केली होती. नगरसेवकांना सभेपूर्वी अर्धा तास लिंक पाठविली होती. सभेपूर्वी सर्वजण लिंकच्या माध्यमातून ऑनलाईन निवडणूक प्रक्रियेत सहभागी झाले.